नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विदर्भातील पक्षाची बांधणी अधिक घट्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे( एसपी) अध्यक्ष शरद पवार शनिवारपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. शनिवारी नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

वर्धा येथे आयोजित सहकार नेते सुरेश देशमुख यांच्या सत्कार समारंभाला पवार उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. पवार सकाळी दहा वाजता नागपुरातील वनामतीमध्ये आयोजित समाजसेवकांच्या कार्यक्रमात सहभागी झाले . त्यानंतर दुपारपर्यंतचा वेळ राखीव आहे. या काळात महायुतीचे अनेक नेते त्यांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा…यवतमाळ : लाडक्या बहिणीचा निधी भावाच्या बँक खात्यात जमा; अर्ज न करताही मिळाले पैसे

गडकरींच्या निवासस्थाना शेजारी मुक्काम

शरद पवार यांचा मुक्काम शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. हे हॉटेल अगदी गडकरींच्या निवासस्थानाला खेटून आहे. सायंकाळी वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात पवार – गडकरी एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचा आढावा

विदर्भातील सर्व ६२ विधानसभा मतदारसंघात पवार यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे सर्वंच निवडणुकीत पवार यांची भूमिका निर्णायक ठरते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी वर्धा लोकसभेची जागा लढवली तेंव्हा भाजपसह मविआचे घटकपक्ष अचंबित होते. मतदारसंघात पक्षाची ताकद मर्यादित असताना आणि त्यात पक्षात फूट पडली असताना पवार ही जागा भाजप सारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पक्षाविरुद्ध लढून कशी जिंकणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पण मोदींची सभा होऊनही ही जागा भाजप हरली. राष्ट्रवादीचे अमर काळे मोठ्या मताधिक्याने जिंकले. पवार यांची जादू काय असते हे दिसून आले. सकाळपासून पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना पवार यांचा पॉवर काय असते दिसून आले. वर्धेची जागा जिंकल्यानंतर पवार यांचा पहिला वर्धा जिल्हा दौरा आहे.

हेही वाचा…लोकसत्ता इम्पॅक्ट… गडचिरोली जिल्ह्यातील गायवाटप घोटाळाप्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्ता दोषी

नागपूर शहरात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहे. यापैकी पूर्व नागपूरवर पवार गटाचा दावा आहे. पक्षाचे पदाधिकारी व माजी उपमहापौर शेखर सावरबांधे व शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे येथून लढण्यास इच्छुक आहेत. ग्रामीणमध्ये काटोल आणि हिंगणा या दोन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहेत, या पैकी हिंगण्याची जागा काँग्रेस लढणार आहे. त्यामुळे हिंगण्याच्या बदल्यात राष्ट्रवादी शहरात एखादी जागा काँग्रेस कडून घेऊ शकते. दक्षिण – पश्चिममध्ये काँग्रेस चा सातत्याने पराभव होत असल्याने येथे नवीन चेहरा उतरवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करू शकते. हा मतदारसंघ कुणबी मराठा बहुल असून या समाजाचे बहुतांश नेते पवार यांना मानणारे आहेत. त्यामुळे मतदारसंघात पवार यांची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. अजित पवार यांच्या गटाचे अस्तित्व नागपुरात नगण्य स्वरूपात आहे.

हेही वाचा…गडचिरोली : ‘लोकसत्ता’चा दणका; वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तिसऱ्या दिवशीच उचलबांगडी

राजकीय चर्चा

पवार यांचा दौरा म्हटलं की राजकीय चर्चांना ऊत येते. काही चर्चा विद्यमान राजकीय घडामोडींशी संबंधित असतात तर बहुतांश चर्चा या भविष्यात घडणाऱ्या राजकीय समिकरणांचे संकेत देणाऱ्या ठरतात. त्यामुळे पवार हे काय बोलतात, त्यांना कोण भेटतात या सर्व हालचालींवर सत्ताधाऱ्यांचे लक्ष असते. त्यामुळे पवार यांचा दौरा महत्वाचा ठरतो.