Sharad Ponkshe on bjp : अकोला : ८० टक्के हिंदू समाज दोन, तीन, पाच टक्क्यांमध्ये विभागला गेला आहे. समोर २० टक्के एकजूट आहेत. कुठल्याही पक्षाने कशासाठी हिंदुंच्या मागे उभे रहावे? हिंदुत्व एकत्र आले तरच राजकीय महत्त्व प्राप्त होईल. टीका करणारे विरोधक देखील नाक घासत येतील. लोकशाहीमध्ये निवडणुका सर्वात मोठे आव्हान असते. भाजप स्वत:चा स्वार्थ बघतोय, तुम्ही पण बघा, असे मत ज्येष्ठ अभिनेते तथा वक्ते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. सोशल मीडियावर टिंगल-टवाळी करणाऱ्यांना चेहरा नसून त्यांच्यात पुरुषार्थ देखील नाही, अशी टीका सुद्धा त्यांनी केली.

अ.भा. ब्राह्मण महासंघाच्यावतीने अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करण्यासोबतच राजकीय चिमटे देखील काढले. 

सावरकर यांनी दाखवलेले हिंदुत्व स्वीकारल्या शिवाय पर्याय नाही

१९४६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, मुस्लीम लीग आणि भारतीय हिंदू महासभेत लढत होती. सावरकर यांनी अतोनात प्रयत्न करूनही हिंदू महासभेला अपयश आले. वास्तविक त्याची विविध कारणे आहेत. स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाली. पाकिस्तान निर्माण झाल्यावर ७० लाख कत्तली झाल्यानंतर भारतीयांना स्वा.सावरकर जे सांगत होते, त्याचे महत्त्व लक्षात आले. हिंदुंचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी सावरकरांनी दाखवलेले हिंदुत्व स्वीकारल्या शिवाय पर्याय नाही, असे शरद पोंक्षे म्हणाले.

संघाच्या कार्यामुळे पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन

मुस्लीम कोणत्याही राष्ट्राचा विचार करूच शकत नाही. जगातील मुस्लिमांचे ध्येय विश्वाला इस्लाम बनवणे आहे. भारतात तीनचे ३० कोटींवर गेले. त्यांचा अजेंडा निश्चित आहे. पश्चिम बंगाल राज्य वाचले. मात्र, इतर सर्व वाचेलच याची शाश्वती नाही. बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या कार्यामुळे परिवर्तन घडून आले, असा दावा शरद पोंक्षे यांनी केला.

माणुसकी धर्माचेच दुसरे नाव हिंदू धर्म

सर्वांशी प्रेमाने वागणे हा मनुष्याचा गुणधर्म. मनुष्यच काय तर पशु, पक्षी, प्राणी, वृक्ष यांना त्रास द्यायचा नाही, हे हिंदू धर्माने शिकवले. फक्त हिंदू धर्मातच दगडाची पूजा होते. आपली संस्कृती दगडातही देव शोधते. विश्वात एकच धर्म तो म्हणजे माणुसकीचा धर्म, त्याचेच दुसरे नाव हिंदू धर्म आहे, असे त्यांनी नमूद केले. हिंदू सोडला तर इतर सर्व माणुसकीचे पालन करीत नाहीत. केवळ हिंदू धर्मातच ‘हे विश्वचि माझे घर’ म्हटले आहे. हिंदुत्वाचे राष्ट्रीयत्व झाल्यास संपूर्ण विश्वाचे कल्याण होईल, असे देखील ते म्हणाले.