नागपूर : मराठी अभिनेते शरद पोंक्षे कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच आता दोन दिवसांपासून शरद पोंक्षे यांनी नागपूरमधील भाषणात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. सर्वच स्तरातून पोंक्षे यांच्यावर टीका होत असताना त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हीडीओ प्रसारित करून आपल्या एका वक्तव्यावर माफी मागितली आहे. 

माझे वक्तव्य तोडून-मोडून फिरवले : पाेंक्षे

शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये शरद पोंक्षे म्हणाले की, ‘नमस्कार! सध्या माझं एक वक्तव्य मीडिया फिरवतंय. अशी नेहमीच माझी वक्तव्य तोडून-मोडून फोडून मीडियावाले फिरवत असतात. संपूर्ण भाषण कोणी कधी दाखवत नाही. माझ्या भाषणातलं मागचं पुढचं सगळं कापून त्यामुळे समाजात वाद कसा निर्माण होईल, याबद्दल काळजी घेऊन नेहमी माझी वक्तव्य टाकत असतात.

मनुस्मृतीबद्दल काय माफी मागितली

शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, ‘माझी दोन वक्तव्य त्यांनी चालवलेली. एक मी आरएसएसबद्दल बोललेलो आणि दुसरं मनुस्मृतीजर वाचली असती, तर ती जाळली नसती, असं मी बोललो. आता हे बोलण्याचा माझा उद्देश असा आहे की, हिंदुत्व या विषयावर बोलत असताना, हिंदू धर्मातील जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवत गीता आहे, रामायण आहे, तर हे सगळं आपण वाचतच नाहीये. हे जर वाचलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय. हा माझा मूळ उद्देश आहे. त्यामुळे मी असं म्हटलं. सगळे वेद, उपनिषदं संपूर्ण भाषण युट्युबवर उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली. आता बाबासाहेबांनी मनुस्मृती जरी जाळली तरी त्यांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केलेला आहे, हे त्यांनी स्वतः म्हटलंय.

खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड

पण, तरीसुद्धा मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती, या वक्तव्यानं जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी क्षमा मागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज सगळेच आपले गुरु आहेत. मी आज २५ वर्षे व्याख्यानं देतोय. २५ वर्षामध्ये मी कधीच कोणत्याही महापुरुषाबद्दल मी एकही अवाक्षर वाईट काढलेले नाहीये. किंबहुना मी सध्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करतोय आणि खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत ते सांगण्यासाठी माझी धडपड चालू आहे. पण ‘मनुस्मृती जर वाचली असती तर ती जाळली नसती’ या माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा, असे म्हणत शरद पोंक्षे यांनी माफी मागितली आहे.