अकोला : १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काँग्रेसऐवजी हिंदू महासभामध्ये गेले. काँग्रेस हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन झालेला पक्ष नाहीच, हे सर्वप्रथम स्वा.सावरकरांनी ओळखले. त्यावेळी स्वा.सावरकर काँग्रेसमध्ये गेले असते तर महात्मा गांधींच्या बाजूला सर्वत्र त्यांचे छायाचित्र लागले असते. राहुल गांधी स्वा.सावरकरांविषयी घाणेरडे बोलूच शकले नसते. मात्र, स्वा.सावरकर राष्ट्रासाठी, त्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात गेले, असे मत ज्येष्ठ अभिनेते तथा वक्ते शरद पोंक्षे यांनी येथे व्यक्त केले.

विविध विषयांवर भाष्यासह काँग्रेसच्या धोरणावर सडकून टीका

अ.भा. ब्राह्मण महासंघाच्यावतीने अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात स्वा.विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पार्थसारखी शुक्ल, तर अतिथी म्हणून ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, जिल्हाध्यक्ष श्याम कुळकर्णी, शहराध्यक्ष अतुल पाटील, महिला आघाडी अध्यक्ष शकुन परांजपे, विदर्भ संघटन मंत्री राजेंद्र टाकळकर, उदय महा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. विनायक देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. नगरसेवक प्रशांत जोशी, नीलेश देव, ॲड. गिरीश गोखले, चंदा शर्मा यांचाही सत्कार करण्यात आला. व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी विविध विषयांवर भाष्य करून काँग्रेसच्या धोरणावर सडकून टीका केली.

‘हिंदू-मुस्लीम भाई-भाई’ हा विचार ब्रिटिशांनी पेरला

१९३७ मध्ये काँग्रेस स्थापन होऊन ५२ वर्ष झाले होते. काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नव्हता. स्वा.सावरकरांना काँग्रेस प्रवेशासाठी विविध माध्यमातून निमंत्रण येत होते. केवळ स्वा.सावरकरांना माहिती होती की, काँग्रेस हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्माण झालेला पक्षच नाही. जे कधी एकत्रित येऊ शकत नाही, असे ‘हिंदू मुस्लीम भाई-भाई’ असा विचार ब्रिटिशांनी काँग्रेसमध्ये पेरला होतो. हिंदू-मुस्लीम कधी एकत्र येणार नाही आणि देशाला स्वातंत्र्य देण्याची गरज भासणार नाही, हा ब्रिटिशांचा कट होता, असे शरद पोंक्षे म्हणाले.

ज्या ब्रिटिशांविरोधात लढा द्यायचा, त्यांच्याच हाती काँग्रेसचे नेतृत्व कसे?

ज्या ब्रिटिशांविरोधात लढा द्यायचा होता, त्याच ब्रिटिशांच्या हाती काँग्रेसचे नेतृत्व का होते? देशातील विद्रोह, संताप शांत करण्यासाठी ब्रिटिशांनी काँग्रेसमध्ये आपले माणसं पेरली होती. देशाला स्वातंत्र्य मिळणार नव्हते. हे स्वा. सावरकरांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे टाळून हिंदू महासभेच्या माध्यमातून देशाला नवा विचार देण्याचे कार्य केले. हिंदू-मुस्लीम विचारातून काँग्रेस आजही बाहेर पडायला तयार नाही, अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली.