नागपूर : देशाच्या सीमा चरख्यावरच्या सुताने नव्हे, तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात आणि त्यावर रक्ताचे शिंपण करून त्या सीमांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त करायचा असतो, असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार अभिनेते शरद पोंक्षे यांनी मांडले. नागपूरमध्ये सावरकरांच्या विचारधारेवर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
कबड्डीच्या मैदानावरील पांढऱ्या रेषांचे उदाहरण देत पोंक्षे म्हणाले की, देशाच्या सीमा केवळ आखून चालत नाहीत, तर त्या टिकवण्यासाठी त्यागाची आणि संघर्षाची तयारी असावी लागते. सीमांवरील रक्तरंजित संघर्षातून शेजारील राष्ट्रांना देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय नागरिक कोणताही त्याग करण्यास तयार आहेत, असा संदेश जातो, असे त्यांनी नमूद केले.
तरुणांनी सैन्यात भरती व्हावे
१९३७ मध्ये सावरकरांची निर्बंधांतून मुक्तता झाल्यानंतरच्या सुमारे दहा वर्षांच्या काळात त्यांनी सातत्याने तरुणांना ब्रिटिशांच्या भारतीय सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले, असे पोंक्षे यांनी सांगितले. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षणासाठी लष्करी प्रशिक्षण आणि सैन्यशक्तीचे महत्त्व सावरकर अधोरेखित करीत होते, असेही ते म्हणाले.
शिवरायांच्या रणनीतीचा दाखला
सुभाषचंद्र बोस यांना उद्देशून सावरकरांनी दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख करताना पोंक्षे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे उदाहरण दिले. शत्रूच्या तावडीत अडकून राहणे म्हणजे शौर्य नव्हे, तर परिस्थितीनुसार शत्रूच्या हातून निसटून योग्य वेळी प्रतिकार करणे महत्त्वाचे असते, असा विचार त्यांनी मांडला.
शिवाजी महाराजांनी भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून शत्रूच्या सैन्याची ताकद कमी केली आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लढाई केली. शत्रूला गाफील ठेवणे, त्याला आपल्या सोयीच्या प्रदेशात आणणे आणि आवश्यकतेनुसार रणनीतीचा वापर करणे, याला राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात, असे पोंक्षे यांनी सांगितले.
