नागपूर: हिंदू धर्मात कधीही जातिव्यवस्था नव्हती. गुणधर्मानुसार केवळ वर्णव्यवस्था होती. मात्र, ब्रिटिशांना भारतावर राज्य करायचे असल्याने येथील संस्कृती संपवण्यासाठी त्यांनी दीड ते दोन हजार जाती निर्माण केल्या. ब्राह्मण हा बुद्धिवान असल्याने त्यांना जातिव्यवस्था आणि जातिभेद पेरणारे म्हणून खलनायक ठरवण्याचे कामही ब्रिटिशांनी केले, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अंदमान एक तीर्थक्षेत्र’ या त्रिदिवसीय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शरद पोंक्षे यांचे ‘हिंदुत्व’ या विषयावर व्याख्यान झाले.

जातिभेद हा शब्दच आपल्याकडे नव्हता

हिंदुत्व ही केवळ धार्मिक नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीची आधारशिला आहे, असे सांगताना पोंक्षे म्हणाले, जातिभेद हा शब्दच आपल्याकडे नव्हता. जगातील सर्वाेत्तम अशी गुणधर्मानुसार असणारी वर्णव्यवस्था होती. गुणानुसार वर्ण बदलता येत होते. परंतु, आज हिंदू म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही. ब्रिटिशांना या देशावर राज्य करायचे असल्याने त्यांनी आपल्याकडील सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला. त्यानुसार आपली संस्कृती संपवण्यासाठी आधी संस्कृत भाषा संपवली. त्यानंतर जातिव्यवस्था उभी करून ब्राह्मणांना चुकीचे ठरवण्याचे काम केले. आर्य कसे बाहेरून आले याचाही प्रचार केला. त्यामुळे तीन वर्णांमध्ये ब्राह्मणांविषयी द्वेष निर्माण झाला.

संस्कृत ही ज्ञानपरंपरेची वाहक भाषा

पोंक्षे यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आयुर्वेद, योग, भारतीय सण-उत्सव, पूजा-पद्धती आणि जीवनशैली या सर्व गोष्टी निसर्गाशी आणि ऋतुचक्राशी जोडलेल्या आहेत. वेद, उपनिषदे आणि प्राचीन ग्रंथांमध्ये या परंपरांचे सखोल तत्त्वज्ञान दडलेले आहे. संस्कृत ही त्या ज्ञानपरंपरेची वाहक भाषा असून तिच्यापासून दूर गेल्याने आपण आपल्या सांस्कृतिक मुळांपासूनही दूर जात आहोत. जगातील सर्वांत प्राचीन आणि सातत्याने टिकून राहिलेल्या संस्कृतींपैकी सनातन संस्कृती ही एक असल्याचे सांगून, तिचे ज्ञान, मूल्ये आणि परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

भाषा आणि संस्कृतीचा ऱ्हास झाला

भाषेचा ऱ्हास झाला तर राष्ट्राची ओळख धोक्यात

राष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास हे त्याच्या अस्तित्वाचे मूलभूत घटक असतात. भाषा आणि संस्कृतीचा ऱ्हास झाला तर राष्ट्राची ओळखही धोक्यात येते. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना याच नीतीचा अवलंब केला होता. सावरकरांचे ‘जे इतिहास विसरतात, त्यांचा भूगोल बिघडतो’ हे वाक्य आजच्या काळातही तितकेच समर्पक असल्याचे त्यांनी नमूद केले.