नागपूर : युरोपातील देशांमध्ये लोक रानटी अवस्थेत वावरत होते, त्यांना कपडे कसे घालायचे याचीही अक्कल नव्हती, तेव्हा माझ्या पूर्वजांनी जगातील पहिला संविधान ग्रंथ लिहिला. तो म्हणजे मनुस्मृती, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी गुरुवारी नागपूर येथे केले. भारतीय प्राचीन ग्रंथसंपदा, संस्कृत भाषा आणि सांस्कृतिक वारसा यांचे महत्त्व विशद करताना त्यांनी सावरकरांच्या विचारांचा दाखला दिला. यावेळी भाजप सरकार, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.
राणी लक्ष्मी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारधारेवर आयोजित व्याख्यानात पोंक्षे बोलत होते. भारतीय ज्ञानपरंपरेपासून नव्या पिढ्या दूर गेल्याची खंत व्यक्त करत त्यांनी संस्कृत, वेद, उपनिषदे, पुराणे आणि महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासावर भर दिला. भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना पोंक्षे म्हणाले, की देवनागरी ही वैज्ञानिक लिपी असून, जसे बोलले जाते तसे लिहिले जाते, हे तिचे वैशिष्ट्य आहे.
गेल्या अडीचशे वर्षांत इंग्रजीचे महत्त्व वाढल्यामुळे भारतीय भाषांकडे दुर्लक्ष झाले. इंग्रजीच्या प्रभावामुळे संस्कृत आणि प्राचीन भारतीय ग्रंथांमधील ज्ञानापासून अनेक पिढ्या दूर राहिल्या. ऋग्वेद हा पहिला छापील ग्रंथ होता, असा दावाही त्यांनी केला. संस्कृत भाषेचे ज्ञान नसल्यामुळे प्राचीन ग्रंथांमधील विचार आणि त्यांचे महत्त्व अनेकांना समजत नाही. पृथ्वीचे गोलाकार स्वरूप आणि विविध ज्ञानविषयक संकल्पनांचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळतो, असे सांगत त्यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व विशद केले.
भाजप सरकारच्या अनेक गोष्टी आपल्याला पटत नसल्याचे सांगतानाच, “हिंदू संस्कृती टिकवायची असेल आणि आपल्या मुलींना बुरख्यात बघायचे नसेल, तर आपल्याला भाजपचेच सरकार हवे,” अशी राजकीय भूमिकाही पोंक्षे यांनी मांडली. भाषा आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध असून, भाषा संपली तर संस्कृतीचे अस्तित्वही धोक्यात येते, असे ते म्हणाले. मातृभाषेचा वापर वाढवणे, भारतीय भाषांमधील साहित्याचे वाचन करणे आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सावरकरांनी भाषाशुद्धीचा पुरस्कार केला होता. भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक अस्मिता जपण्यावर त्यांनी भर दिला, असेही पोंक्षे यांनी सांगितले.
सावरकरांच्या साहित्याची उपेक्षा झाल्याची भावना
सावरकरांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करताना पोंक्षे म्हणाले, की सावरकरांनी सुमारे २० हजार पृष्ठांचे साहित्य लिहिले. रवींद्रनाथ टागोर यांना पुरस्कार मिळाल्यानंतर सावरकरांनी मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन केले. मात्र, त्याच तोडीचे साहित्य निर्माण करूनही क्रांतिकार्यात सहभागी झाल्यामुळे आपल्याला पुरस्कारांपासून वंचित ठेवण्यात आले, अशी भावना सावरकरांच्या मनात आली असण्याची शक्यता आहे, असे त्यांनी नमूद केले.
गांधींमुळे भारतात मुस्लीम राहिले
स्वातंत्र्यानंतर भारताच्या शिक्षणव्यवस्थेची दिशा ठरवण्याचा अधिकार मुस्लीम केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आला, अशी टीका पोंक्षे यांनी केली. स्वातंत्र्यानंतर पहिले पाच केंद्रीय शिक्षणमंत्री मुस्लीम होते, असे सांगत त्यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवरही टीका केली. मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण झाल्यानंतरही महात्मा गांधी यांच्यामुळे भारतात आठ टक्के मुस्लीम राहिले, असे विधान त्यांनी केले. आयुष्यभर सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारे सावरकर अखेर उपोषणाच्या मार्गाने गेले, तर आयुष्यभर उपोषण करणाऱ्या महात्मा गांधी यांचा मृत्यू गोळी लागून झाला, असे विधानही त्यांनी केले.
भरकटलेली तरुणाई रस्त्यावर
डाव्या विचारसरणीच्या संघटनांवर टीका करताना पोंक्षे म्हणाले, की इतिहासाची माहिती नसलेली आणि आंदोलनामागील कारणांची जाणीव नसलेली तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. या तरुणांनी सावरकरांचे साहित्य वाचलेले नाही. केवळ आम्ही म्हणतो म्हणून राजीनामा द्या, अशी मागणी केली जाते. मात्र, संबंधित व्यक्तीने नेमका कोणता गुन्हा केला, हे सांगितले जात नाही. आरोप सिद्ध न करता राजीनाम्याची मागणी केली जाते, असा आरोप त्यांनी केला.
