बुलढाणा: वरील यादी वाचून कुणीही बुचकळ्यात पडणे स्वाभाविक आहे. बातमीचे शीर्षकच तसे असल्याने कुणीही गोंधळून जाण्यात गैर काहीच नाही. ही महायादी आहे पोलिसांनी एका महा अड्डयावर केलेल्या महाकारवाईची. वर्षभर अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी गजबजणाऱ्या विदर्भ पंढरी शेगाव ची काळी बाजू दाखविणारी आणि संतनगरीत काळ्या व्यवसायाने किती कळस गाठला हे दर्शविणारी ही मोठी आणि सर्वांनाच थक्क करणारी ही महा कारवाई आहे.

अपर पोलीस अधिक्षक (खामगांव ) डॉ.श्रेणिक लोढा यांच्या पथकाने शेगाव येथील जुगार अड्यावर मोठी कारवाई केली आहे. शेगाव येथील जुगार अड्यावर मोठी कारवाई करीत नगदी १७ लाख ५२ हजार ३२० रुपयासह १२ महागड्या चारचाकी ( कार), ५ मोटार सायकल, ५२ मोबाईल सह तब्बल ६२ लाखापेक्षा जास्त रुपयाचा मुदेमाल जप्त केला आहे. काल शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अपर पोलीस अधिक्षक (खामगांव) श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ६१ धन दांडग्या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये शेगाव मधील आदर्श रिसॉर्ट चे मालक विलास प्रल्हाद घाटोळ यांच्यासह जळगाव खान्देश, अकोला बुलढाणा जिल्ह्यातील जुगार शोकीन आरोपीचा समावेश आहे. यामध्ये बहुसंख्य आरोपी जळगाव खान्देश जिल्ह्यातील आहेत.

काही आरोपी अकोला जिल्ह्यातील आहे. श्रेणिक लोढा यांना या जुगाराची टीप मिळाली होती. डॉ. श्रेणिक लोढा यांच्या सह अपर पोलीस अधिक्षक, कार्यालय खामगांव येथील सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार प्रभंजन जोशी, शिवशंकर वायाळ तसेच खामगांव शहर पोलीस ठाण्याचे येथील सहायक फौजदार बाळू डाबेराव, पोलीस हवालदार गोपाल सातव, शेख मुजीब, नितीन पाटील, संदिप गवई, पोलीस जमादार अमरदीप ठाकूर, आशीष ठाकूर यांनी काल ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजता आदर्श रिसोर्टवर छापा घातला.यावेळी एकाच वेळी तब्बल ६० आरोपी जुगार खेळतांना आढळून आले.त्यांचे कडुन नगदी १७ लाख ५२ हजार ३२० रुपयासह १२ कार वाहन, ५ मोटार सायकल, ५२ मोबाईल सह एकुण ६२ लाख २ हजार रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. रिसॉर्ट मालकासह एकुण ६१ लोकांच्या विरुध्द जुगार कायदयान्वये पोस्टे शेगांव शहर येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही निलेश तांबे, पोलीस अधिक्षक, बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधिक्षक, खामगांव, प्रदिप पाटील. उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या खळबळजनक कारवाईचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक संदिप बारींगे हे करीत आहे.