बुलढाणा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शेगाव दौऱ्यानिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान मधील दर्शन बंद राहणार असा मजकूर समाज माध्यमावर वेगाने प्रसारित होत आहे. यामुळे गजानन महाराजांच्या हजारो भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नियोजित दौऱ्यानुसार राष्ट्रपती श्रीमती मुर्मु या २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे येणार आहे. त्यामुळे २५ च्या आसपास दर्शन बंद राहणार अश्या समाज माध्यमावरील मजकूराने हजारो भाविक संभ्रमित झाले आहे. मात्र ही चर्चा, मजकूर केवळ अफ़वाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज दिवसभर यासंदर्भात संस्थान आणि प्रसिद्धी माध्यमाकडे राज्यातून विचारणा होत असल्याचे चित्र आहे. विविध समाज माध्यमावर हा मजकूर वेगाने प्रसारित झाला.’ त्यावर ‘ज्यांना शेगांव दर्शनाचा मानस आहे त्यांनी, २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान शक्यतो टाळावे, कारण महामहीम राष्ट्रपतींचा शेगांव भेटीचा दौरा निश्चित झाला आहे. सर्व यात्री निवासमधे कमांडो निवास व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक दर्शन ही २५ तारखेला राष्ट्रपती महोदया आवारात असे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कृपया नोंद घ्यावी’ असा हा मजकूर होता. या पार्श्वभूमीवर पडताळणी केली असता समाज माध्यमावरील हा मजकूर चुकीचा व अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

श्री गजानन महाराज मंदिर येथे २३ ते २६ मार्चदरम्यान महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या प्रस्तावित भेटीच्या पार्श्वभूमीवर दर्शन बंद ठेवले जाणार असल्याच्या चर्चानी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र या सर्व चर्चा निराधार असून कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य भक्तांना दर्शनापासून वंचित ठेवण्याचा निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट झाले. सुरक्षा यंत्रणांच्या प्रोटोकॉलनुसार काही वेळा अल्पकालीन हालचाली किंवा व्यवस्थात्मक बदल आवश्यक ठरू शकतात. मात्र याचा अर्थ दर्शन पूर्णतः बंद होणार नाही असे स्पष्ट झाले आहे . संत गजानन महाराज संस्थान तर्फे आज संध्याकाळी उशिरा मार्फत कोणतेही प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले नाही.

मात्र जवाबदार सूत्रांनी, २३ पासूनच दर्शन बंद ची समाज माध्यम वरील चर्चा केवळ अफ़वाच असल्याचे सांगितले. राष्ट्रपती मुर्मु २५ ला शेगावात येताहेत. त्या दिवशी एक दोन तास दर्शन बंद राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे निर्देश येऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात कार्यक्रम

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेगांव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतेच शेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली होती.

उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, पालकमंत्री मकरंद पाटील, सह पालकमंत्री संजय सावकारे, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आ.संजय कुटे, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री वैद्य देवेंद्र त्रिगुणा, आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्मा यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्वेद महासंम्मेलनाला देण्यात आली आहे.