Shegaon Gajanan Maharaj Temple : बुलढाणा : विदर्भ पंढरी शेगाव येथे वर्षभर आबालवृद्ध भाविकांची मंदियाळी राहते. आषाढी, कार्तिकी एकादशी, राम नवमी, गजानन महाराज प्रगट दिन, गुरू पौर्णिमा, नव वर्षारंभ, यांसारख्या दिवशी तर भाविकांची संख्या लाखाच्या घरात जाते. भाविकांसाठी गजानन महाराज संस्थानमार्फत सर्व त्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यांचबरोबर भाविकांनी संस्थांनाच्या शिस्तीचे, नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. इतर संस्थांनाच्या तुलनेत शेगाव संस्थान शिस्तबद्ध सेवेसाठीदेखील प्रसिद्ध आहे.
हा आहे नवीन नियम
आता संस्थांनाच्या नियमात एका नवीन नियमाची भर पडली आहे. हा नियम अनेक भाविकांना अडचणीचा वाटू शकते. मात्र भाविकांना या नियमाचे काटेकोर पालन करावे(च) लागणार आहे. आज ११ मेपासून गजानन महाराज मंदिर परिसरात सर्वांचा लाडका असलेल्या मोबाईलचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेश द्वारावरच भाविकांना आपल्याजवळील मोबाईल बंद करावे अर्थात ‘स्विच ऑफ’ करावा लागणार आहे.
श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच भाविकांना ‘श्रीं’चे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता यावे, यासाठी मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत जातानाच आपापले मोबाईल बंद करणे आवश्यक आहे.
उद्देश काय?
मंदिरांच्या परिसरात सध्या मोबाईलचा अतिरेक झाला आहे. मोबाईलमधून सेल्फी काढणे, फोटो काढणे, मोठ्या आवाजात संभाषण करणे, व्हिडिओ काढणे, आदी कारणांमुळे ‘श्रीं’च्या मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना त्रास होत आहे. देवदर्शन करताना त्यांची एकाग्रता भंग होत आहे. यामुळे भाविकांना यापुढे आपला मोबाईल बंद ठेवावा लागणार आहे. मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येणार आहे. मग जमा केलेला हा मोबाईल परत मिळविण्यासाठी निर्धारित कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. यामुळे होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी संस्थानची अपेक्षा आहे.
संस्थानकडून सहकार्याचे आवाहन
श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांनी ’श्रीं’च्या मंदिर परिसरातील शिस्त, शांतता आणि पावित्र्य राखण्यासाठी घेतलेला हा निर्णय भाविकांच्या सोयीसाठीच आहे. योग्य व्यवस्थापन आणि भाविकांना ‘श्रीं’चे शांततेत दर्शन मिळावे, हा यामागचा शुद्ध हेतू आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी या नियमाचे पालन करून संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन गजानन महाराज संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
