शेगाव : विदर्भपंढरी शेगाव चे नाव पुढे आल्यावर संत गजानन महाराज संस्थान, वर्षभर साजरे होणारे उत्सव डोळ्यासमोर येतात. एक प्रकारे शेगाव म्हणजे अध्यात्म नगरी ठरली आहे. मात्र नुकतेच आखाती राष्ट्रातील दुबई येथील एका स्पर्धेत शेगावचा गवगवा झाला. संतनगरीच्या युवतीने तिथे शेगावचा नव्हे महाराष्ट्र अन देशाचाही नांवलौकिक वाढविला. ती ‘मिस आशिया वर्ल्ड २०२५ ‘ ची मानकरी ठरली. यामुळे शेगाव नगरी सध्या आषाढी एकादशी सोहळ्याने आनंदाने न्हाऊन निघाली असतानाच शेगावकर कन्येच्या यशाचा देखील जल्लोष साजरा करीत आहे.
साधारण परिवारातील युवतीने शिक्षणानंतर वेगळीच वाट चोखाळली. अनिश्चित अश्या सौन्दर्यस्पर्धा, मॉडेलिंग च्या क्षेत्राकडे ती वळली. खडतर संघर्ष, परिश्रम करीत तिने या क्षेत्रात आता नावलौकिक मिळविला
नुकतेच गायत्री रोहनकर हिने ब्रिस्टोल हॉटेल देरा, दुबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत ‘मिस एशिया वर्ल्ड २०२५’ हा किताब पटकावला आहे. या यशामुळे गायत्रीने केवळ शेगावचेच नाही, तर संपूर्ण भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
‘सौन्दर्य म्हणजे जवाबदारी’…
या स्पर्धेत आशियातील विविध देशांतील ४० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. विविध फेऱ्यांमधून पारख करण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये गायत्रीने आपली बुद्धिमत्ता, सौंदर्य, सामाजिक भान आणि संवादकौशल्य यांमुळे परीक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेतील अंतिम फेरीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गायत्री म्हणाली, “आधुनिक युगात सौंदर्य ही फक्त देखाव्यापुरती गोष्ट नसून, ती एक जबाबदारी आहे. सौंदर्य म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात आशा निर्माण करणारी प्रेरणा.” तिच्या या विचारशील उत्तराने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले आणि एकमताने तिला ‘मिस एशिया वर्ल्ड ’चा किताब बहाल केला.
प्रसिद्ध सिने अभिनेत्री मिस वर्ड अदिती गोविलकर यांच्या हस्ते तिच्या डोक्यावर विजयाचा मुकुट ठेवण्यात आला. यावेळी सर्व सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले गायत्रीने आपल्या कुटुंबीयांचे, देशवासीयांचे आभार मानले. तिने सांगितले की, “माझं हे यश माझ्या गावासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी आहे. मला अभिमान वाटतो की मी ग्रामीण भागातून येऊन आज आशियातील सर्वोच्च सौंदर्यस्पर्धा जिंकली आहे.”
शेगावमध्ये तिच्या घरी आणि परिसरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. गायत्री रोहनकरने यापूर्वीही विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. गायत्री रोहनकर ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील असून तिचे प्राथमिक शिक्षण स्थानिक विद्यालयात झाले. तिने इंजिनीअरिंगनंतर मॉडेलिंगमध्ये आपले करिअर घडवले.
सौंदर्याच्या जोडीने तिने सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला असून, ग्रामीण भागातील मुलींसाठी ‘उज्ज्वला’ या नावाने आरोग्य व शिक्षण विषयक उपक्रम राबवले आहेत.