बुलढाणा: ‘माझे जीवाची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।’ या अभंगातील भावना व श्रद्धे प्रमाणे विदर्भातील संत नगरी शेगाव ( बुलढाणा जिल्हा ) येथून तेहतीस दिवसांपूर्वी निघालेली गजानन महाराज यांची पालखी आज शुक्रवारी ४ जुलै रोजी भूतलावरील वैकुंठ म्हणून विख्यात पंढरपुरात डेरे दाखल झाली आहे .
तब्बल ३३ दिवस राज्यातील ९ जिल्ह्यातून ७५० किलोमीटर चा खडतर पायी प्रवास करुन आणि अंगावर ऊन पाऊस झेलत ही पालखी श्री क्षेत्र पंढरपूर नगरीत दाखल झाली. या पालखीत धवल वस्त्रधारी ७०० वारकरी, ९ वाहन, २ अश्व, बँड पथकाचा समावेश आहे. शेगाव येथील गजानन महाराज संस्थानाची ही पालखी पंढरपूर येथे ९ जुलै पर्यंत मुक्कामी राहणार आहे.
‘पावलो पंढरी वैकुंठ भुवन। धन्य आजी दिन सोनियाचा॥’ या अभंगाप्रमाणे आलेले वारकरी भरून पावल्याची भावना व्यक्त करीत असल्याचे यावेळी दिसून आले.राज्यासह देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील गजानन महाराज पालखीचे आज मंगळवेढा येथील विसाव्या नंतर पंढरपूरात आगमन झाले.
सुवर्ण महोत्सवी परंपरा
श्री संत गजानन महाराज संस्थान पालखीचे यंदा ५६ वे वर्ष आहे. संत गजानन महाराज संस्थान सेवा शिस्त आणि स्वच्छता या त्रीसूत्रीसाठी प्रसिद्ध आहे.पालखीत सुद्धा ही शिस्तबद्धता पाहायला मिळते. शेगाव येथील मंदिरातून २ जूनला निघालेल्या या दिंडीचा प्रवास 33 दिवसाचा आहे.
पंढरीत ९ जुलैपर्यंत मुक्काम
गजानन महाराज संस्थानच्या पंढरपूर शाखेत श्रींच्या पालखीचा ९ जुलै पर्यंत मुक्काम राहणार आहे. या ठिकाणी भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी आयोजित करण्यात आले आहे. आलेल्या भाविकांना ७ जुलै पर्यंत पंढरपूर शाखेत महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगाव कडे १० जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास आहे. असा येण्या जाण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करतात. ३० जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर ३१ जुलै रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे.