लोकसत्ता टीम

बुलढाणा : संतनगरी शेगावमध्ये एका अनोखळी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा छडा लागला असून त्या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मृत महिला आणि मारेकरी पती हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात शवविच्छेदन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर निर्णायक घटक ठरला.

यापूर्वी १ ऑगस्ट रोजी सकाळी शेगाव येथील अग्रसेन चौकातील देविदास सुपडु कासार यांच्या भांड्याच्या दुकानासमोरील ओट्यावर एक महिला मृतावस्थेत आढळली होती. याची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शेगाव येथीलच सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शवविच्छेदनाचा अहवाल धक्कादायक आला. सदर महिलेचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी तपासचक्रे वेगात फिरवीली. तपासादरम्यान अग्रसेन चौकातील नगर परिषदच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सिसीटीव्ही फुटेज’ची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ ऑगष्ट २४ रोजी मध्यरात्री दोन वाजून ४२ मिनिटे ते ३ वाजून ७ मिनिटं या दरम्यान सदर महिला झोपलेली असतांना अज्ञात इसम तिथे आल्याचे दिसून आले. तो गाढ झोपेत असलेल्या महिलेचा गळा आवळत असल्याचे दिसुन आले.

आणखी वाचा-“उद्धव ठाकरेंनी संयम बाळगावा…” खा. प्रफुल पटेल यांचा सल्ला; म्हणाले, “ते वक्तव्य…’’

…आणि आरोपी जाळ्यात

पोलिसांनी सखोल तपास केला असता असता मृत महिलेचे नाव कविता गौतम गाडेकर (५० रा. बाळापुर जि. अकोला) असल्याचे निष्पन्न झाले .तसेच आरोपी हा महिलेचा पती गौतम गाडेकर असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक कुणाल जाधव यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून आरोपी गौतम गाडेकर विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार आयरे करीत आहेत. या घटनेमुळे संतनगरी शेगाव आणि बाळापूर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

‘झेडपी’ महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या

दरम्यान बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयात कार्यरत महिला कर्मचारीने स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. यामुळे जिल्हा परिषद सह प्रशासकीय वर्तुळ हादरले असून बुलढाणा शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोनल मनीष परदेसी ( वय ३५ वर्षे) असे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करणाऱ्या महिला कर्मचारी चे नाव आहे. शुक्रवारी, २ ऑगस्टला सोनल परदेसी यांनी आपले कार्यालयीन कामकाज केले. यानंतर त्या सर्क्युलर रोडवरील जिल्हा परिषदेच्या शासकीय निवासस्थानी आल्या. यावेळी तिचे सासू, सासरे घरी होते. मात्र सोनल ने आपल्या खोलीत जात पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही ब बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.

आणखी वाचा-चंद्रपूर : ४० जिवंत काडतुसे, तलवार व वाघनखं… युवा सेना जिल्हाप्रमुखाच्या घरून शस्त्रसाठा जप्त

गूढ कायम

दरम्यान या दोन्ही घटनेचे गूढ आज शनिवारी (दिनांक ३) कायम असल्याचे वृत्त आहे. शेगावच्या घटनेतील प्रौढ आरोपी पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या का केली? याचा शेगाव पोलीस तपास करीत आहे. या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे बुलढाणा येथील कर्मचारी महिलेने का आत्महत्या केली? याचेही गूढ कायम आहे. वरकरणी सर्व काही आलबेल असताना सोनल परदेसी यांनी केलेली आत्महत्या, कर्मचाऱ्यांच्या हृदयाला चटका लावणारी आणि बुचकळ्यात पाडणारी ठरली आहे.