गडचिरोली : तालुक्यातील कळमटोला येथील प्रभाकर तुकाराम निकुरे या ६० वर्षीय गुराख्यास वाघाने ठार केले. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास कळमटोला गावापासून काही अंतरावरील वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील कक्ष क्रमांक १ च्या जंगलात घडली. प्रभाकर निकुरे हे दुपारी ३ वाजताच्या सुमारास जंगलात गुरे चारण्यास गेले असता झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.
यात ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दीड महिन्यांपूर्वी प्रभाकर निकुरेच्या भावालाही वाघाने ठार केले होते. ऐन दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.