नागपूर : महाराष्ट्रातील वन्यजीव गुन्ह्यांमध्ये गेल्या १३ वर्षांपासून फरार असलेल्या शेरू पारधीला मध्य प्रदेश टायगर स्ट्राइक फोर्सने अटक केल्यानंतर त्याच्याविरोधातील महाराष्ट्रातील प्रकरणे पुन्हा ऐरणीवर आली आहेत. शेरूविरोधातील प्रलंबित प्रकरणे, त्याच्याविरोधातील वॉरंट अथवा नोटिसा आणि तपासाची सद्यस्थिती तपासून पुढील कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने (डब्ल्यूसीसीबी) नागपूर प्रादेशिक वनविभाग आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला दिले आहेत.

डब्ल्यूसीसीबीचे निर्देश काय?

डब्ल्यूसीसीबीच्या पश्चिम क्षेत्राचे प्रादेशिक उपसंचालक वरकड योगेश निळकंठ यांनी पाच सप्टेंबरला यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र वन विभागाला पाठविले. शेरू छेलाल धुर्वे ऊर्फ शेरू छेलाल राजगोंड हा मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील बिरोली येथील रहिवासी असून, त्याला मध्य प्रदेश टायगर स्ट्राइक फोर्सने अटक केली. महाराष्ट्रातील नागपूर प्रादेशिक वनविभाग आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील वन्यजीव गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड असल्याची माहितीही डब्ल्यूसीसीबीने दिली आहे. शेरूच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील या प्रकरणांमध्ये त्याच्याविरोधात कोणती कारवाई प्रलंबित आहे, वॉरंट किंवा नोटिसा जारी झाल्या आहेत का, तसेच तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, याची पडताळणी करण्याची जबाबदारी आता संबंधित वन अधिकाऱ्यांवर आली आहे. मध्य प्रदेश टायगर स्ट्राइक फोर्सशी समन्वय साधून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचेही डब्ल्यूसीसीबीने सुचविले आहे.

शेरूविरोधातील गुन्हे

डब्ल्यूसीसीबीच्या अहवालानुसार नागपूर प्रादेशिक वनविभागात शेरूविरोधात ८ जून २०१३ ला गुन्हा क्रमांक ३२/१२, तर २४ सप्टेंबर २०१३ ला ३२/१५ दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत तो फरार असल्याची नोंद आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही त्याच्याविरोधात एक प्रकरण नोंद असल्याचे डब्ल्यूसीसीबीने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणाचा क्रमांक आणि सविस्तर तपशील सध्या उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. कर्नाटकातील नागरहोल व्याघ्र प्रकल्पातील २००२ मधील ०६/२००२ या प्रकरणाचाही अहवालात उल्लेख आहे.

वाघांची शिकार करणारा शेरू पारधी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

आतापर्यंत आठ आरोपींना अटक

शेरूची अटक मध्यप्रदेशातील बालाघाट येथे वाघाची शिकार करून त्याची कातडी, हाडे आणि अन्य अवयवांची तस्करी करणाऱ्या संघटित टोळीच्या तपासातून झाली. या प्रकरणात आतापर्यंत पाच राज्यांतील आठ आरोपींना अटक झाली आहे. या टोळीतील सदस्यांनी महाराष्ट्रासह तेलंगणा, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील विविध भागांत वाघांची शिकार केल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. वाघांचे अवयव ईशान्य भारतातील तस्करांमार्फत पुढे म्यानमारमार्गे चीन आणि अन्य देशांत पाठविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही तपासात समोर आल्याचे मध्यप्रदेश वनविभागाने म्हटले आहे.