चंद्रशेखर बोबडे

नागपूर: पूर्व विदर्भाचे केंद्र असलेल्या नागपूरपासून तर दुर्गम गडचिरोली जिल्ह्यापर्यंत गाव तेथे शाखा असलेल्या शिवसेनेला गेल्या चार दशकांत या भागात पक्षाचे नेतृत्व उभे करता आले नाही. कारण ज्यांच्या हाती सेनेने पक्षाची सूत्रे दिली ते आमदार, खासदार झाल्यावर दुसऱ्या पक्षात गेले हाच पूर्व विदर्भातील शिवसेनेचा इतिहास आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे व आता शिवसेनेचे सहयोगी आमदार आशीष जयस्वाल यांनी शिंदेगटात दाखल होत तीच परंपरा कायम ठेवली. शिवसेनेने १९८० च्या दशकात विदर्भात प्रवेश केला. वर्षांनुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या प्रस्थापितांना विरोध करणाऱ्या तरुणांना शिवसेनेच्या रूपात राजकीय व्यासपीठ मिळाले. सेना या भागात आपसूकच वाढत गेली. प्रत्येक गावात सेनेचे भगवे ध्वज व फलक झळकू लागले. सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढणाऱ्या तरुणांची संघटना, असे स्वरूप त्या काळात शिवसेनेचे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे व हिंदुत्वाचे आकर्षण होतेच. सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळायला लागल्यावर शिवसेनेने भाजपशी युती करीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांही लढवल्या. काही ठिकाणी त्यांना यशही मिळाले. पण यात सातत्य सेनेला राखता आले नाही. यासाठी स्थानिक पातळीवर नेतृत्व उभे करून त्याला बळ देण्यात सेना कमी पडली. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचा शिडी म्हणून वापर केला. सेनेच्या नावावर निवडून यायचे, सत्तेसाठी पक्ष बदल करायचा हेच प्रकर्षांने या भागात झाले. त्यामुळे नेतृत्वाची मोठी पोकळी या भागात निर्माण झाली ती अद्यापही कायम आहे.

sushma andhare
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; सुषमा अंधारे
navi mumbai municipal corporation to open wetlands for residential complexes zws
पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात
Naran Rathwa news
काँग्रेस नेत्यांची पक्ष सोडण्याची मालिका सुरूच! पाच वेळा खासदार राहिलेल्या नारन राठवा यांचा भाजपात प्रवेश; कारण काय?

शिवसेना सोडून जाणाऱ्या प्रमुख नेत्यांची यादी मोठी आहे. यापैकी काही टिकले व बहुतांश राजकारणाबाहेर गेले. १९९१ मध्ये छगन भुजबळ यांच्याबरोबर गेलेल्या पूर्व विदर्भातील आमदारांमध्ये नामदेवराव दोनाडकर (ब्रम्हपुरी) यांचा समावेश होता. त्यानंतर दोनाडकरही संपले व या भागात सेना खिळखिळी झाली. तर नारायण राणेंसोबत विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर सेनेला वडेट्टीवार यांच्या चिमूर मतदारसंघात त्यांच्या तोडीचा नवा नेता निर्माण करता आला नाही. नागपूरशेजारी रामटेक हा सेनेचा बालेकिल्ला येथून लोकसभा निवडणूक जिंकणारे सुबोध मोहिते यांना सेनेने केंद्रात मंत्री केले. पण तेही काँग्रेसमध्ये गेले. मोहिते यांनी पक्ष सोडल्यावर या मतदारसंघात सेनेची ताकद कमी झाली. नागपुरात तर सेनेला एकही आमदार चाळीस वर्षांत निवडून आणता आला नाही. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला होता. तेथून तीन वेळा निवडून आलेले अशोक शिंदे सध्या काँग्रेसमध्ये गेले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या अपक्ष निवडून आलेले रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल व भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर बंडखोर शिंदे गटांसोबत आहेत.

पक्ष सोडल्याने संघटनेवर परिणाम

वरील सर्व नेत्यांच्या पक्ष सोडण्याने त्या-त्या भागात संघटना कमकुवत झाली. सर्व सूत्रे स्थानिक नेत्यांच्या हाती देणे ही नेतृत्वाची चूक या पक्षाला नडली. दुसऱ्या फळीचे नेतृत्व तयार करण्यावर संघटनेने भर दिला असता तर नेता सोडून गेला तरी संघटनेला झळ पोहचली नसती. मात्र त्या दिशेने विचारच करण्यात आला नाही. सत्ता आल्यावर मुंबई-ठाणे-पुण्यावरच लक्ष केंद्रित करणाऱ्या सेना नेतृत्वाने विदर्भाकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका पक्षाला पुढच्या काळात बसण्याची शक्यता आहे.