नागपुरात सरसंघचालक, गडकरींशी भेट

भाजप-सेना युती तुटण्यासाठी शिवसेनाच कारणीभूत असून त्यांच्या गैरसमजामुळे हा प्रकार घडला, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती तुटल्याचे खापर शिवसेनेवर फोडले.

दानवे मंगळवारी नागपुरात होते. त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आपण नागपुरात आलो होतो. मतदानाचा दिवस असल्याने सर्व नेते मंडळी येथे मिळतील, हे लक्षात घेऊनच हा दिवस निवडला, असे ते म्हणाले. सुरुवातीला दानवे सरसंघचालकांना भेटले व त्यानंतर ते महाल येथील गडकरी यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेशी युती तोडण्याच्या संदर्भात विचारल्यावर ते म्हणाले की, भाजप-शिवसेना युती ही २५ वर्षांपासून कायम होती. मात्र, सेनेचा काहीतरी गैरसमज झाला व त्यातून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल, असा दावा करताना त्यांनी बंडखोरीचा फटका या निवडणुकीत बसणार नाही, असे स्पष्ट केले. बंडखोरी प्रत्येक वेळी होतेच. त्यानंतर ते पुन्हा पक्षात येतात. यावेळी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.