शिवसेनेने महापालिकेच्या तोंडावर युती न करण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर उपराजधानीत कार्यकत्यार्ंमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शहरातील शिवसेनेच्या रेशीमबागमधील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

शिवसेनेने गेल्या दोन महिन्यापासून महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केले होते. युती होऊ नये अशी येथील स्थानिक कार्यकत्यार्ंची इच्छा होती. शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी सांगितले होते. गुरुवारी मुंबईला झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी युती न करता महाराष्ट्रात स्वतंत्रपणे शिवसेना भगवा ध्वज फडकवेल, अशी घोषणा केली आणि विदर्भातील शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जल्लोष केला. पूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले शेखर सावरबांधे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा पक्षात प्रवेश केल्यानंतरही ते आज जल्लोषाच्यावेळी दिसले नाहीत. रस्त्यावर फटाके फोडले जात असताना वाहतूक खोळंबली होती.

महापालिका निवडणुकीत शिवसेना १५१ जागा लढविणार असून प्रचारादरम्यान महापालिकेतील भ्रष्टाचार हा आमचा प्रमुख मुद्दा राहणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून लवकरच यादी संपर्क प्रमुखांना देण्यात येईल आणि मुंबईवरून यादी जाहीर केली जाईल. शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नसून सर्व जुने शिवसैनिक सोबत काम करतील.

–  सतीश हरडे, जिल्हा प्रमुख, शिवसेना