नागपूर : सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशाच्या पूर्वसंध्येला विरोधक आणि सत्ताधारी दोघांच्याही पत्रकार परिषदा झाल्या. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षेनेते पदाच्या मुद्यावर विरोधक आक्रमक दिसून आले. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आणि काँग्रेसचे नेते डॉ. नितीन राऊत उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर सडकून टीका केली. मात्र आता विरोधकांच्या पत्रकार परिषदेमधील छायाचित्र समोर आले असून यात अनिल परब आणि नितीन राऊत यांना डुलकी आली होती. विशेष म्हणजे परब एक तासाच्या पूर्ण पत्रकार परिषदेत झोपून होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परिषदेमधून त्यांनी विरोधकांसोबतच्या प्रत्येक चर्चेला आम्ही तयार असल्याची भूमिका घेतली. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्याही देहबोलीतून त्यांच्यासमोर विरोधकांचे कुठलेही आव्हान नसून त्यांची कोंडी करणार असल्याचे संकेत दिले.

दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भाष्कर जाधव दोघांनीही सरकारवर सडकून टीका केली. व अधिवेशनात विरोधक आक्रमक भूमिका घेणार याचे संकेत दिले. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या देहबोलीत सावधता होती. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनीही कायम सरकारवर टीका करण्यापेक्षा विरोधकांनी सकारात्मक चर्चा करावी, असे आवाहन केले. तसेच विरोधी पक्षनेते पदासाठी खुर्चीची लालसा सोडून आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिला.

फडणवीस व शिंदे यांनी अधिवेशनात कशावर भर दिला जाईल यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारावर अधिक बोलले. यावेळी काँग्रेस या निवडणुकीमध्ये कुठेही नव्हती अशी टीका करत विरोधकांची कोंडी केली.

वेगळा विदर्भ म्हणणाऱ्यांनी २०१४ नंतरचा विदर्भ पाहावा

मुख्यमंत्री वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस या मागणीवर वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. यावर भाष्कर जाधवांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आधी वेगळ्या विदर्भाची गाेष्ट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सत्ता येताच सूर बदलल्याचा आरोप त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देत वडेट्टीवार आणि जाधव यांनी २०१४ पूर्वीचा आणि नंतरच्या विदर्भाची तुलना करावी. २०१४ नंतर विदर्भाचा प्रचंड विकास झालेला आहे. वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी नजिकच्या गडचिरोली जिल्ह्याचा आज चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे विरोधकांनी विदर्भावर टीका करण्यापेक्षा येथील विकास बघावा असेही फडणवीस म्हणाले.