बुलढाणा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत २०२३ मध्ये घेतलेल्या लिपीक टंकलेखक परीक्षेची निवड यादी अद्याप जाहीर झालेली नाही. आयोगाकडून ‘तारीख पे तारीख’ देऊन परीक्षार्थींचा अपेक्षाभंग केला जात आहे. निकाल घोषित होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहू, अशी रोखरोठ भूमिका शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ मध्ये ७००६ पदांसाठी महाराष्ट्र संयुक्त गट-क लिपिक-टंकलेखक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांपासून विद्यार्थी निवड यादीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांच्या एका शिष्टमंडळाने (विद्यार्थ्यांनी ) बुलढाणा येथील संपर्क कार्यालयात भेटून जयश्री शेळके यांच्या समक्ष आपले गाऱ्हाने मांडले. तसेच त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासमोर अनिश्चिततेचं मोठं सावट पसरलं असून शासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत. आयोगाच्यावतीने याआधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निकाल जाहीर करण्यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र आता जून महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम निकाल जाहीर करणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने अंतिम निकाल जाहीर करावा, अशी सर्व पात्र विद्यार्थ्यांची मागणी आहे. युवकांच्या या संघर्षाला आमचा ठाम पाठिंबा असून विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहू असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या. निवड यादी लवकर जाहीर झाली नाही तर आंदोलन उभारण्याचा इशारा शेळके यांनी यावेळी बोलताना दिला.