अमरावती: शिव ठाकरे हा टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा. बिग बॉस, खतरों के खिलाडी, झलक दिखला जा यासारख्या रिॲलिटी शो मधून त्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मूळचा अमरावतीकर शिव ठाकरे याचे इन्स्टाग्रामवर २.४ मिलीयन म्हणजे २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शिव ठाकरे हा आता चित्रपटात पदार्पण करणार असून त्याचा पहिला मराठी चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटाची घोषणा त्याने केली आहे.

‘रक्तनीती’तून चित्रपट पदार्पण

‘रक्तनीती’ हा शिव ठाकरेचा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रदीप खैरवार आणि शेफाली सिंग राजपूत हे आहेत. तर प्रशांत पांडे यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. प्रदीप खैरवार हे हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले निर्माते, दिग्दर्शक असून त्यांनी रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या ‘रक्त चरित्र’ या हिंदी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. शिव ठाकरे याने समाज माध्यमाद्वारे या चित्रपटाची घोषणा केली आहे.

प्रसिद्धीआधीची मेहनत फळाला

शिव ठाकरे छोट्या पडद्यावर प्रसिद्ध आहे, पण ही प्रसिद्धी मिळण्याआधी शिवने खूप मेहनत घेतली आहे. पैसे कमवण्यासाठी त्याने अमरावतीत वृत्तपत्र विकण्याचे काम केले आहे. तसेच तो घरोघरी जाऊन दुधाच्या पिशव्यांची विक्रीही करत होता. नृत्याची आणि अभिनयाची आवड असल्याने त्याने डान्स क्लास घ्यायला सुरूवात केली. सर्व कामांतून मिळणारे पैसे शिव त्याच्या आईला देत असे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते, हे ध्यानात ठेवून शिवने आयुष्य जगण्यास सुरूवात केली. एकेक टप्पा पार करत, त्याने ही प्रसिद्धी मिळवली आहे.

सामान्य माणसाचा चित्रपट

नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्याआधी शिव ठाकरे याने मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. एका छोट्या शहरातून आलेला एक तरूण स्वप्न पाहतो, मुंबईत हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी वीस वर्षे लागतात. चित्रपटविश्वात पदार्पण ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असे शिव ठाकरे याने सांगितले. लहानपणापासून नाटकांमध्ये काम करण्याची आवड होती, त्याचा फायदा आपल्याला झाला. रक्तनीती हा चित्रपट एका सामान्य माणसाचा चित्रपट आहे. साध्या माणसाच्या कुणी वाकड्याला गेला, तर तो काय करू शकतो, हेच या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे, असे त्याने सांगितले.