अकोला : शहरातील ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळावरून आता पायलट घडणार असून विमान उड्डाणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने प्रशिक्षण केंद्राला हिरवी झेंडी दिली. भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ‘फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (एफटीओ) धोरणांतर्गत पायलट प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले असून त्यासाठी स्कायनेक्स कंपनीसोबत सामंजस्य करार झाला. त्यानुसार येत्या काही महिन्यांमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात होईल. शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी या अगोदरच राज्य सरकारने २०९ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणारे अकोल्यातील शिवणी विमानतळाचा आता पायलट प्रशिक्षणासाठी वापर होणार आहे. १९४३ मध्ये शिवणी विमानतळाची उभारणी झाली. विमानतळाच्या १४०० मीटर लांबीच्या धावपट्टीचा विस्तार १८०० मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीची एकूण ६०.६८ हेक्टर जमीन प्राधिकरणाला दिली. धावपट्टीच्या विस्तारासाठी आणखी २२.२४ हेक्टर खासगी भूसंपादनाची गरज आहे. भूसंपादनासाठी राज्य शासनाने २०९ कोटीच्या निधीला मंजुरी दिली. त्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी पाठपुरावा केला. भूसंपादनचे प्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहिती आहे. या विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू होण्यासाठी केंद्र शासनाकडे खासदार अनुप धोत्रे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली.
भारताला जागतिक उड्डाण प्रशिक्षण केंद्र बनविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विविध विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू केले जात आहेत. उड्डाण प्रशिक्षण केंद्रासाठी प्राधीकरणाने निविदा मागविल्या होत्या. या निविदाप्रक्रियेनुसार जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या. अकोल्यातील शिवणी विमानतळावर प्रशिक्षणासाठी स्कायनेक्स कंपनीसोबत सामंजस्य करार झाला. प्राधिकरणाने निकष ठरवून दिले असून यात विमानसेवा, सुरक्षा, यंत्रणा, मनुष्यबळ, वैमानिकांना प्रशिक्षणाचा अनुभव आदींचा समावेश आहे. या केंद्राच्या माध्यमातून विमानाच्या पायलट यांना प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील हवामान अनुकूल ठरणार आहे.
प्रशिक्षणासाठी धावपट्टी विस्ताराची गरज नाहीच
पायलट प्रशिक्षण केंद्र शिवणी विमानतळाच्या विद्यमान धावपट्टीवरच सुरू केले जाणार आहे. त्यासाठी धावपट्टी विस्ताराची देखील गरज राहणार नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात शिवणीवरून उड्डाणाचे धडे पायलट गिरवणार आहेत.
हवाई वाहतुकीच्या चालनेसह रोजगार निर्मिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी शिवणी विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी दिली. यासंदर्भात कंपनीसोबत सामंजस्य करार, अनामत रक्कम आदी प्रक्रिया पूर्ण झाली. यानिमित्ताने हवाई वाहतुकीला चालना मिळणार असून रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे, अशी माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली.
