नांदगाव, वारेगाव येथील प्रदूषणाचा मुद्दा राज्यात गाजल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी येथे भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाजनकोने टाकलेल्या मंडपात न जाता थेट गावकऱ्यांनी पंप हाऊसजवळ टाकलेल्या मंडपाला भेट दिली. जमिनीवरच बसून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदगाव या गावातील दोन विहिरी असलेल्या पेंच नदीत थेट राखेच्या बंधाऱ्यातील राख सोडली जाते. ते ठिकाण पर्यावरणमंत्र्यांना दाखवण्यासाठी गावकरी उत्सुक होते. या राखेच्या बंधाऱ्यामुळे संपूर्ण गावात तसेच त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पूर आल्याची माहिती ग्रामस्थांनी त्यांना दिली. राख टाकणे बंद करण्याचे आदेश तात्पूरते आहेत की कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश आहेत, असा प्रश्न महिलांच्यावतीने प्रदूषणमुक्तीच्या लढ्यात समोर असणाऱ्या अश्विनी ठाकरे यांनी विचारला. यावर हे आदेश कायमस्वरुपी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी थेट राख बंधाऱ्याला भेट दिली आणि नांदगाव राख तलाव तसेच वारेगाव राा तलाव येथे कोणतीही राख टाकली जाणार नाही, असे जाहीर केले. १०० टक्के फ्लाय ॲश वापरण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले. या निर्णयावर नांदगवावासी प्रचंड आनंदी झाले. आमची जमीन पूनर्संचयित केली जावी आणि जुन्या जिर्णोद्धाराचा सविस्तर आरखडा गावकऱ्यांसोबत तयार करावा, अशी भूमिका सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या(सीएफएसडी) लीना बुद्धे यांनी मांडली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या विनंतीनुसार सीएफएसडी नांदगावच्या महिलांसोबत काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

“औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेमुळे नांदगाव, वारेगाव येथील लोकांच्या श्वासाची नळी बंद झाली आहे. त्यांच्या जीवनाची राख होत आहे. हे चित्र कसे बदलता येईल यावर ठोस पावले उचलण्यासाठी नांदगाव, वारेगावला भेट दिली आहे. येत्या १५ दिवसात राखेने भरलेले तलाव रिकामे करण्याचे निर्देश महाजनकोला देण्यात आले असून या निर्देशाचे पालन झाले की नाही हे पाहण्यासाठी मार्च महिन्यात पुन्हा एकदा येथे भेट देणार,” असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

“वीजनिर्मिती असो वा इतर प्रकल्प, ते असायलाच हवे, पण विकास होताना तो शाश्वत विकास व्हावा. कुठेही स्थानिकांवर अन्याय होऊ नये. पर्यावरणाचा ऱ्हास न होता शाश्वत विकास व्हावा. अनेकदा याबाबत धोरण तयार केले जातात, पण ते कागदावरच असतात. प्रत्यक्षात त्याठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर वास्तव कळते. या प्रकल्पात अनेकांच्या जमिनी गेल्या, पण त्यांना रोजगार मिळाला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येईल. फ्लाय ॲश वापरणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. प्रामुख्याने रस्ते तयार करताना त्याचा वापर केला जातो. अशा कंपन्यांची भेट घेऊन नागपूरात त्यांच्यासोबत परिषद आयोजित करण्यात येईल. अशा कंपन्यांसोबत करार करुन महाजनकोला १०० टक्के फ्लाय ॲश वापरासाठी देता येईल. विकासाला हात न लावताही प्रदूषण मुक्ततेवर काम करता येऊ शकते. महाजनकोच्या अधिकाऱ्यांसोबत कोराडी व खापरखेडा या दोन्ही केंद्राबाबत चर्चा करण्यात येणार आल्याचे,” आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena aditya thackeray sat on floor while discussion with villagers over pollution in nagpur sgy
First published on: 14-02-2022 at 16:31 IST