scorecardresearch

आ. तानाजी सावंत यांचे भाजपच्या गडाला शह देण्याचे संकेत

महापालिका निवडणुकीच्या काळात सोलापूर, धाराशिव, पुण्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी होती.

shiv sena bjp
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पक्ष बांधणीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचे नागपुरात जनता दरबार

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांचे नागपुरात जनता दरबार आयोजित केले जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी देऊन एकप्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वर्चस्व असलेले भाजपच्या गडाला शह देण्याचे संकेत त्यांनी दिले.

शिवसेनेच्या पदाधिकारी व पराभूत उमेदवाराच्या चिंतन बैठकीसाठी आमदार तानाजी सावंत नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले नसले तरी येणाऱ्या काळात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्षबांधणी केली जाणार असून मे महिन्यात नव्याने शहर आणि जिल्ह्य़ाची कार्यकारिणी तयार करणार आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष नाही तर येत्या काळात नागपुरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित केले जातील. पदाधिकाऱ्याच्या बैठकी घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आणि केंद्रात भाजपसोबत आहोत. त्यामुळे स्पर्धा करायची नसली तरी संघटन मजबुतीसाठी काही उपाययोजना कराव्या लागणार आहे. सुरुवातीपासून भाजपचे संघटन मजबूत असल्यामुळे शिवसेनेला संघटन मजबुतीसाठी वेळ लागेल मात्र त्यासाठी पक्षाच्या नेत्यांचे विदर्भात दौरे कसे घेता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. शिवाय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कार्यकर्त्यांंचा मेळावा घेऊन त्यांना आमंत्रित केले जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या काळात सोलापूर, धाराशिव, पुण्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी होती. त्यामुळे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले. निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी संपर्क प्रमुख प्रमुख जबाबदारी दिली असताना त्यामुळे नागपूर संदर्भात विशेष माहिती नव्हती. त्यामुळे या भागात लक्ष देऊ शकलो नाही. कार्यकारिणीमध्ये निष्ठावंतांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही. जे काम करतील त्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान दिले जाणार आहे. निष्ठावंत म्हणवून घेणारे अनेक शिवसैनिक पक्ष वाढविण्यासाठी किती काम करतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे. शिवसेनेत कुठलीही गटबाजी नाही आणि गटबाजी करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही. खंडणी वसुलीसाठी शिवसैनिक काम करीत असतील तर त्यांची नावे समोर आली तर योग्य ती कार्यवाही पक्षाकडून केली जाईल, असेही सावंत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-04-2017 at 03:17 IST
ताज्या बातम्या