अकोला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, हे कार्यकर्ता म्हणून आमची इच्छा आहेच. मात्र, शेवटी संख्याबळ महत्त्वाचे असते. २८८ पैकी ६० आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पद मागणे योग्य होणार नाही. आगामी काळात मोठे संख्याबळ निर्माण करावे लागेल, असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे व्यक्त केले.
अकोला येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनिमित्त आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य करीत २०२९ मध्ये शिवसेनेचे लोकसभा आणि विधानसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
स्वबळाचे सूतोवाच
आगामी निवडणुकांमध्ये युती होईल किंवा नाही, शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारसंघात मात्र पक्षाची भक्कम ताकद निर्माण करावी, असे आवाहन अकोला जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. शिवसेना अकोला जिल्ह्याच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन शिबीरामध्ये ते बोलत होते.
यावेळी आमदार तथा विभागीय नेते बच्चू कडू, अकोला लोकसभा संपर्कप्रमुख डॉ. राजन साळवी, शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया, युवा सेना सचिव विठ्ठल सराफ पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षसंघटना बांधणीवर अधिक भर देण्याचे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. प्रास्ताविक माजी आमदार डॉ. राजन साळवी यांनी केले. सूत्रसंचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांनी केल्याची माहिती अनिल मालगे यांनी दिली.
परिवहन मंत्र्यांकडून बसस्थानकाची अचानक पाहणी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांसाठी उपलब्ध असुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. बसस्थानकावरील स्वच्छता, सुरक्षा उपाययोजना, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिकीट आरक्षण केंद्र तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सखोल तपासणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि जाणून घेतल्या. काही ठिकाणी स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देत एसटी ही सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असल्याचे अधोरेखित केले.
कोणतीही तडजोड नाहीच
बसेसच्या वेळापत्रकानुसार धावण्याची स्थिती, चालक-वाहकांची उपस्थिती, तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रशासनाने नियमित निरीक्षण करून तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा आणि सुरक्षितता या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
