अकोला : अमेरिकेसोबतचा व्यापार करार रद्द करावा व शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम देण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली. जिल्ह्यात ३६ ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून केंद्र व राज्य शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिका व्यापार करारादरम्यान भारताला अत्यंत मोठा धक्का दिला. व्यापार कराराकरिता भारतावर प्रचंड दबाव अमेरिकेचा होता. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारानंतर भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे वारंवार सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कदायक निर्णय घेत थेट भारतातून होणाऱ्या सौरऊर्जेच्या आयातीवर तब्बल १२६ टक्के टॅरिफ लादण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या मुद्द्यावरून चांगलीच टीका-टिप्पणी होत आहे. हाच मुद्दा शिवसेना ठाकरे गटाने घेऊन करार रद्द करण्याच्या मागणीसाठी आज तीव्र आंदोलन छेडले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यात पक्षाच्यावतीने ३६ ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. केंद्र सरकारने अमेरिकेसोबत व्यापार करार केल्याने शेतमालाचे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. परिणामी, अमेरिकेसोबतचा व्यापार करार रद्द करावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीची मदत जाहीर करतांना शेतकऱ्यांना पीक विम्याची हेक्टरी १७ हजार रुपये मदत जाहीर केली होती. ती अद्याप मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ मदत जमा करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारत व अमेरिका कराराचा शेतीवर काय परिणाम?

भारत-अमेरिका व्यापारी करारामुळे भारतीय कृषी क्षेत्रात संमिश्र परिणाम अपेक्षित आहेत. चहा, कॉफी, मसाले आणि फळांच्या निर्यातीला करमुक्त प्रवेश मिळाल्याने निर्यातीला चालना मिळेल. मात्र, सोयाबीन तेल, काजू, फळे आणि लाल ज्वारी यांसारख्या अमेरिकी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी केल्याने स्थानिक बाजारपेठेत स्वस्त मालामुळे स्पर्धा वाढून भारतीय शेतकऱ्यांच्या, विशेषतः दुग्ध व कडधान्य उत्पादकांच्या, उत्पन्नावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्याला घेऊन शिवसेनेने आज आंदोलन केले आहे.