गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. मोनू त्रिलोक शर्मा (२६, रा.गडचिरोली), प्रफुल्ल विठ्ठल येलुरे (२०), शुभम रुपचंद लांजेवार (२४), महेश मधुकर धोंगडे (२०) सर्व रा. चामोर्शी, अशी मृतांची नावे आहेत. मृत चार जणांसह अन्य काही युवक चिचडोह बॅरेजवर गेले होते.

पाच जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाले. एक जण कसाबसा बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक खांडवे आपले सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परंतु नाव उपलब्ध नसल्याने पोलिसांनी पाण्यात उड्या मारल्या. तासभर शोधमोहीम राबविल्यानंतर पोलिसांनी काही युवकांच्या साह्याने दोरखंडाचा आधार घेत चार युवकांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Story img Loader