भंडारा : गजभिये विरुद्ध कटकवार या जुन्या वैमनस्याचे रूपांतर टोळी युद्धात झाले असून सोमवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान भंडारा जवळील गणेशपूर येथील रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे शूटआऊट चा थरार घडला. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून भंडारा शहर ठाणेदार सुभाष बारसे चौकशी करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान सावन उर्फ भोला कटकवार हा हातात पिस्तूल घेऊन रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे चिराग गजभिये याच्या घरचा पत्ता शोधत होता. खूप वेळ झाला तरीही त्याला पत्ता सापडत नसल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केला ज्यात गजभिये च्या तीन घर अंतरावर असलेल्या अंकुश शहारे याच्या घरी गोळी लागल्याने तो थोडक्यात बचावला. दरम्यान परिसरातील लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे तत्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि थोड्याच वेळात सूत्रे हलवून हल्लेखोर सावन उर्फ भोला कटकवार याला ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> बुलढाणा : काँग्रेस कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, घोषणाबाजीने तणाव

काय होते जुने प्रकरण  ..

मागील वर्षी २१ ऑगस्ट रोजी भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे अभिषेक कटकवार या तरुणाची जुन्या वादातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. घटनेच्या आठ दिवसांपूर्वी अभिषेकचा आरोपींसोबत वाद होऊन सामान्य रुग्णालय परिसरात भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी अभिषेकला आरोपींनी गणेशपूर येथे बोलावून घेतले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास दगडाने ठेचून त्याची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तलवारीसह तिघांना ताब्यात घेतले होते. मृतक अभिषेक कटकवार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील टप्पा मोहल्यात वास्तव करत होता. सोमवारी ताब्यात घेतलेला सावन उर्फ भोला कटकवार हा जुन्या वादतील मृतक अभिषेकचा पिता आहे.

हेही वाचा >>> अमरावती : अप्पर वर्धा धरणाची तीन दारे उघडली, प्रतिसेकंद ४७ घनमीटर पाण्याचा विसर्ग

१२ जूनला केला होता प्राणघातक हल्ला …

त्यानंतर १२ जून २०२४ ला अभिषेक कटकवार खून प्रकरणातील जुन्या वादावरून तेजस घोडीचोर (२०) रा. ग्रामपंचायत चौक गणेशपुर याने १२ जून रोजी रात्रीच्या दरम्यान विशेष उर्फ कालू हुसेन नंदेश्वर याच्यावर हल्ला केला होता. गणेशपुर ते पिंडकेपार नाल्यावरील पुलावर मोहित मडामे (१८) रा. गणेशपुर याने कालू याला फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले. तेथे तेजस याने कालूला अभिषेक कटकवार याची हत्या केली तशी तुझीही हत्या करतो असे बोलुन धारदार चाकुने पोटावर मारुन जखमी केले. कालूचा मित्र चेतन राजेश तिघरे (१९) रा. सिव्हिल लाईन भंडारा हा भांडण सोडविण्यास आला असता चेतन तिघरे याने लोखंडी राँडने डोक्यावर मारुन त्यालासुद्धा जख्मी केले होते. याप्रकरणी तेजस घोडीचोर, मोहित मडामे, मासुम खोब्रागडे रा. बेला, चिराग गजभिये रा. मंगल पांडे वार्ड, आकाश बोरकर (१९) रा. गणेशपुर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादी कालू व त्याचा मित्र चेतन तिघरे यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.

टोळीयुद्ध भडकले …

सोमवारच्या शूटआऊट आधी या प्रकरणात मागील एका वर्षात तीन वेळेस राडा झाला असून गजभिये विरुद्ध कटकवार वाद थांबण्याचे चित्र दिसत नाही. जून्या वादातून हल्ला करण्याचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. जुन्या वैमनस्याचे रूपांतर आता टोळी युद्धात झालेले आहे.