राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये ‘शॉर्ट कट’ चालत नाही. लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवले जाऊ शकत नाही. लोक नंतर अशांना दारात उभेदेखील करीत नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून रोगरहित लिंबुवर्गीय रोपटे तयार करणे, या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत गडकरी बोलत होते.

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. भाजप पडद्याआडून बंडखोरांच्या मदतीने सरकार स्थापनेचे प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. गडकरी स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेकवेळा अप्रत्यक्षरित्या भाजपच्या अलीकडच्या राजकारणावर मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी लिंबुवर्गीय फळांबाबत बोलताना राजकारणातील ‘शॉर्ट कट’बाबत भाष्य केले. ते म्हणाले, हे युग गुणवत्तेचे आहे. राजकारण असो किंवा व्यापार-व्यवसाय, त्याला पर्याय नाही. जे लोक ‘शॉर्ट कट’चा अवलंब करतात. पण त्यांना भविष्य नाही. लोकांना एक-दोन वेळा मूर्ख बनवले जाऊ शकते, परंतु ते वारंवार शक्य नाही. जेव्हा लोकांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते, तेव्हा ते अशांना दारात उभेदेखील करीत नाही.

महाराष्ट्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर गडकरी यांनी आज अप्रत्यक्षरित्या टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.