सरकारी रुग्णालयांत लसींचा तुटवडा; दहा महिन्यांत बळींची संख्या ६८१ वर

राज्यात ‘स्वाइन फ्लू’ वाढत असताना बहुतांश सरकारी रुग्णालयांत ‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंधात्मक लसीचा पाच महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला असून, गर्भवतींना प्रतिबंधात्मक (इन्फ्लुएन्झा- ए, एच १ एन १) लस देण्याचेही काम थांबले आहे.

‘स्वाइन फ्लू’चा सर्वाधिक धोका मधुमेह, रक्तदाब, गर्भवती महिला, हृदयरोग, मूत्रपिंड व फुप्फुसाचा विकार असणाऱ्यांना असतो. तो टाळण्यासाठी २०१५ मध्ये राज्याच्या साथरोग विभागाच्या तांत्रिक समितीने या अतिजोखमेतील रुग्णांना ‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधित लस देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांसह इतर २२४ केंद्रांवर वैद्यकीय तपासणीला येणाऱ्या गर्भवतींना जुलै २०१५ पासून ‘स्वाइन फ्लू’ (इन्फ्लुएन्झा- ए, एच १ एन १) प्रतिबंधात्मक लस देणे सुरू झाले. ही लस घेतल्यावर प्रसूतीपर्यंत महिलेला पुन्हा लस घेण्याची गरज नसते, परंतु राज्यात १ जानेवारी २०१७ पासून ‘स्वाइन फ्लू’चे थैमान असताना कुठेही गर्भवतींसाठी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. ऑक्टोबर २०१७ मध्ये एकाही महिलेला लस देण्यात आली नाही. त्यामुळे ‘स्वाइन फ्लू’ची गर्भवतींना लागण होऊन कुणाचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, राज्यात १ जानेवारी २०१७ ते १७ ऑक्टोबर २०१७ पर्यंत ‘स्वाइन फ्लू’ची १४ हजार ८२० रुग्णांना लागण झाली असून त्यातील  ६८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू हे पुणे विभागात (२१०) झाले असून त्यानंतर नागपूर विभाग (१०८), नाशिक विभाग (९१), कोल्हापूर विभाग (८१), ठाणे विभाग (६४), औरंगाबाद विभाग (४७), अकोला विभाग (३८), लातूर विभाग (१०), मुंबई (३२) चा क्रमांक लागतो. विदर्भात सर्वाधिक मृत्यू हे नागपूर शहरात (४२) नोंदवले गेले आहेत. या विषयावर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

४ गर्भवतींसह ९ महिलांचा मृत्यू

राज्यात २१ ऑगस्ट २०१७ ते आजपर्यंत ‘स्वाईन फ्लू’ने ४ गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यात सांगली, सातारा, अमरावती, नागपूरच्या पारडी येथील प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे, तर ४ मार्च ते आजपर्यंत प्रसूतीनंतर राज्यात ५ महिला स्वाईन फ्लूने दगावल्या असून त्या अहमदनगर, अमरावती, पुणे, नागपूर, नाशिक येथील असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात आले आहे. स्वाईन फ्लूच्या धास्तीने नागरिकांमध्ये खळबल उडाली आहे.

राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांत गर्भवतींसह अतिजोखमेतील रुग्णांकरिता स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेकडे येत आहेत. रुग्ण हा आरोग्य विभागाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्याकरिता शासनाने तातडीने सर्व रुग्णालयांत लसी उपलब्ध करून द्याव्या.

– डॉ. प्रमोद रक्षमवार, राज्य सरचिटनीस, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो)

आरोग्य विभागाकडे स्वाईन फ्लू लसींचा तुटवडा असला तरी अतिजोखमेतील रुग्णांना लस देता यावी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांना प्रत्येकी १.३८ लाख रुपयांच्या निधीतून लसी खरेदी करण्याचे अधिकार दिले आहे. त्यानुसार आवश्यक त्या ठिकाणी गर्भवती महिलांनाही लस दिली जात आहे. कुठे नसेल तर त्या उपलब्ध केल्या जाईल.

डॉ. एम.एस. डिग्गीकर, सहसंचालक, आरोग्य सेवा (साथरोग विभाग)