शिक्षण मंचच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे यांचे टीकाकारांना आव्हान; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर :  विद्यापीठ शिक्षण मंच ही राजकीय नव्हे तर शिक्षकांची संघटना आहे. विद्यापीठ कायदा मोडून आम्ही कधीही कोणतेही काम केले नाही. पात्रतेचे निकष आणि गुणवत्तेला डावलून आम्ही विद्यापीठामध्ये एकही नियुक्त्या केल्या नाही. कुणी जर असा आरोप करत असेल तर तो साफ चुकीचा आहे. शिक्षण मंचाशी संबंधित एक तरी व्यक्ती पात्रता निकषात बसणारी नसल्याचे दाखवून द्या, उद्याच आम्ही त्याचा राजीनामा मागू, असे थेट आव्हान विद्यापीठ शिक्षण मंचच्या प्रमुख व माजी महापौर डॉ. कल्पना पांडे यांनी टीकाकारांना दिले.

‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता डॉ. पांडे व शिक्षण मंचाचे महामंत्री डॉ. सतीश चाफले यांनी विद्यापीठातील नियुक्त्या, प्राधिकरणांवरील नामनिर्देशन, विविध उपक्रम आणि आगामी काळात होऊ घातलेल्या प्राधिकरण निवडणुकांसाठी  विद्यापीठ शिक्षण मंचाची तयारी, आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी  डॉ. कल्पना पांडे यांनी विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये शिक्षण मंचाचा किंवा खुद्द त्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप फेटाळून लावला. त्या म्हणाल्या, विद्यापीठाच्या कुठल्याही निर्णयामध्ये आजपर्यंत मध्यस्थी केली नाही. आमची संघटना ही शिक्षकांसाठी काम करते, त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना न्याय देणे यावर अधिक भर आम्ही देत असतो.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर जरी शिक्षण मंचाचे सर्वाधिक सदस्य असले तरी निर्णयप्रक्रियेमध्ये सर्वच संघटनांच्या सदस्यांचा सहभाग असतो. विद्यापीठातील महत्त्वाचे निर्णय व्यवस्थापन परिषदेमध्ये होतात. यात जसे शिक्षण मंचाचे सदस्य आहेत तसे इतर संघटनांचेही आहेत.  इतरांचा विरोध असताना आजवर कुठलाही निर्णय झालेला नाही. केवळ शिक्षण मंचाचे सदस्य म्हणतात म्हणून घेतलेला एकतरी निर्णय, ठराव दाखवून द्यावा, असे आव्हान डॉ. पांडे यांनी दिले. विद्यापीठ कुठल्याही एका विचारधारेवर चालत नाही. येथे सर्वच विचारांना समान संधी आहे. विद्यापीठ हे लोकशाही व्यवस्थेला मानणारे आहे.

विद्यापीठात सर्वाचे मत विचारात घेऊनच  कार्यक्रम होतात. आमचा त्यात कुठेही हस्तक्षेप नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंचाच्या कार्यक्रमाला पदाधिकारी आल्यास गैर काय?

विद्यापीठ कायद्यानुसार महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना राजकीय संघटनेच्या व्यासपीठावर जाण्यास बंदी आहे. तो कायद्याचा भंग ठरतो. मात्र, आमची संघटना ही केवळ शिक्षकांसाठी काम करते. तिचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे शिक्षण मंचाच्या कार्यक्रमाला विद्यापीठातील कुठले पदाधिकारी आल्यास त्यात गैर काय, असा सवालही डॉ. कल्पना पांडे यांनी केला.

कल्पना पांडे यांच्या उमेदवारीसाठी मंच आग्रही

आज शिक्षण मंचाचे २५०० नोंदणीकृत सदस्य आहेत.  एम.फिल. झालेल्या शिक्षकांना पदोन्नती मिळवून देण्याचे यशस्वी काम शिक्षण मंचाने केल्याची माहिती डॉ. सतीश चाफले यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात आमचे काम मोठे असून आगामी विधानपरिषदेच्या शिक्षक आमदार निवडणुकीत डॉ. कल्पना पांडे यांच्या उमेदवारीसाठी मंच आग्रही असल्याचेही चाफले यांनी सांगितले.

करोना काळात शिक्षकांना मदत

करोना काळात तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या हातचे काम गेले होते. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. विद्यापीठ क्षेत्रातील अशा ३३ प्राध्यापकांची यादी करून त्यांना महिनाभर पुरेल इतक्या धान्याचे संच आणि आठ हजार रुपये  शिक्षण मंचाने दिल्याची माहिती कल्पना पांडे यांनी दिली. मंचाला असा सेवेचा वारसा असून नको त्या राजकारणात आम्ही पडत नसल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.