माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा आरोप; स्वतंत्र विदर्भाबाबत आक्रमक
विदर्भाचा अनुशेष वगैरे काही नसून विदर्भाच्या वाटय़ाला आलेल्या निधीची पश्मिच महाराष्ट्राने कायम चोरीच केली असल्याचा आरोप राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी येथे केला. महाधिवक्तापदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच त्यांचे येथे आगमन झाले. स्वतंत्र विदर्भवाद्यांनी अणे यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर आयोजित सभेत अणे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका मांडताना ही लढाई आता अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट केले.
येथील संविधान चौकात श्रीहरी अणे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात अणे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचा इतिहास, या चळवळीवर पश्चिम महाराष्ट्राकडून होणारे आरोप आणि आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली. विदर्भ वेगळा झाल्यास तो आर्थिकदृष्टय़ा सक्षम होणार नाही, या आरोपाचे खंडन करताना ते म्हणाले की, आम्ही स्वतंत्र झालो तर आमचे आम्ही पाहून घेऊ, पण विदर्भ वेगळा झाल्यावर महाराष्ट्राचे काय होईल याचा विचार आरोपकर्त्यांनी करावा, महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून सातत्याने विदर्भाची लूट चालू आहे. या भागाचा पैसा पश्चिम महाराष्ट्रात वळता केला जात आहे. याला शासकीय भाषेत अनुशेष असे नाव असले तरी प्रत्यक्षात ती चोरीच आहे आणि ही बाब दांडेकर समितीच्या अहवालापासून तर त्यानंतर नियुक्त केलेल्या इंडिकेटर अ‍ॅण्ड बॅकलॉग समितीपर्यंत आणि अलीकडच्या केळकर समितीच्या अहवालात या चोरीचे (अनुशेष) आकडे देण्यात आले आहे. ऐकीकडे विदर्भाचा निधी पळवायचा आणि दुसरीकडे या भागातील नेतृत्त्वावर टीका करायची हा दुट्टपीपणा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यापयर्ंत एकाही मुख्यमंत्र्यांना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे व त्यावर अन्याय करू नये, असे का वाटले नाही.

अणे म्हणाले..
* स्वतंत्र विदर्भाची मागणी हिंदी भाषकांची असल्याची टीका तथ्यहीन
* स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठीची लढाई अंतिम टप्प्यात
* हिंसक वळण लागू नये ही इच्छा; मात्र हिंसक वळण लागल्यास जबाबदारी आमची नाही