बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव म्हणजे विदर्भ पंढरी, संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पावन अशी भूमी. मात्र याच शेगाव येथील रहिवासी एका प्रतिभाशाली युवकाने संत नगरी शेगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजविले आहे. शेगावचा नवलौकिक देश विदेशात वाढविला आहे.
थायलंडमध्ये डंका
शेगाव येथील युवा तंत्रज्ञ शुभम गजानन तायडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शेगाव सह जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथे नुकतेच पार पडलेल्या ‘स्पेस इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ या स्पर्धेत शुभम यांची चमुसहभागी झाली. या चमुला ‘स्पेस शिफ्ट – कंपनी अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘फ्लडलेन्स एआय’ या प्रकल्पाने जागतिक पातळीवर मोठी मजल मारली आहे.
पुरावर संशोधन
‘फ्लडलेन्स एआय: फ्रॉम सॅटेलाइट ऑब्झर्वेशन्स टू ॲक्शनेबल फ्लड रिस्पॉन्स इंटेलिजन्स’ या संकल्पनेवर हा प्रकल्प आधारित आहे. यामध्ये उपग्रहांचे निरीक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करून पूरस्थितीचे अचूक विश्लेषण केले जाते. पूरग्रस्त भागांची तातडीने माहिती मिळवून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य वेळी निर्णय घेण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
जपान स्पेस फोरमचे आयोजन
‘जपान स्पेस फोरम’तर्फे ‘एपआरएसएएफ-३२’ या कार्यक्रमाअंतर्गत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘युनिसेक’ आणि क्युशु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहकार्य लाभले. या संशोधन प्रकल्पात शुभम तायडे यांच्यासोबत अनुकृती दीक्षित आणि शशांक मौर्य यांनीही मोलाचे योगदान दिले. शुभम तायडे हे बेंगळुरू येथील ‘डीएफवाय-ग्रॅविटी टेक्नॉलॉजीज’ या संस्थेशी जोडलेले आहे. ते अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक क्षेत्रांत काम करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल वडील जी. ओ. तायडे, आई सुनीता तायडे यांच्यासह मित्रपरिवार आणि शेगावमधील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेगावच्या या होतकरू युवकाने जागतिक स्तरावर उमटवलेली ही छाप संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
