नागपूर : सध्या बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजाबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संतापाचे वातावरण असताना आता बागेश्वर बाबाला आव्हान देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यावरही संतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागपुरातील संत गुलाब बाबा सेवा आश्रमने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करीत फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

श्याम मानव यांनी संत गुलाब बाबा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी गुलाब बाबा सेवाश्रम’च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी त्वरित कारवाईसाठी पावले उचलली नाहीत तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. रेशीमबाग येथील संत गुलाब बाबा सेवा आश्रमचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने यांच्या नेतृत्वाखाली भाविकांनी महाल येथील कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. या प्रसंगी श्रीकांत शिवणकर यांनी मदने यांच्याकडे या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. या शिष्टमंडळात वडालकर, चंदू दंदे, अविनाश नाईक आणि सेवाश्रमाचे अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.

काय म्हणाले श्याम मानव

श्याम मानव यांनी संत गुलाब बाबा यांना नंबरी, मुलींच्या अंगावर पाणी उडवणारा बाबा असे विधान एका कार्यक्रमात केले होते, असा आरोप आहे. याशिवाय अनेक आक्षेपार्ह विधाने त्यांनी केली. त्यांच्या विधानाची यादी संत गुलाब बाबा सेवा आश्रमचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमाने यांनी तक्रारीसोबत दिली आहे. संतांवर बिनबुडाचे आरोप करून स्वतःचे महत्त्व वाढवणे हा श्याम मानव यांचा धंदा असल्याची टीका भाविकांनी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आडून अनेकांबाबत खोटेनाटे दावे करणाऱ्या मानव यांच्यावर आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टिका केल्यानेही वादात

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली होती. या भेटीचे फोटो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात दिसून आले. यावर श्याम मानव यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भूषण गवई यांच्यावर टीका केली होती. भूषण गवई धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते याचा मला प्रचंड धक्का बसला आहे. भूषण गवई म्हणतात की मी स्वतः आंबेडकरी विचाराचा आहे. आंबेडकरी विचारांचे मी दूध पिलो आहे पण तो माणूस जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असेल तर आता तुम्ही यापुढे आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचं नाही तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे, असे श्याम मानव म्हणाले होते.

यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्याम मानव यांच्यावर तोंडसूख घेत सल्ला देणारे तुम्ही कोण असा सवाल केला होता. त्यानंतर भूषण गवई यांचे बंधू डॉ. राजेंद्र गवई यांनी हिंमत असेल तर मला रोखा, तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी एकटा निशस्त्र येईल, तुम्ही जर एका बापाचे असाल तर माझा आव्हान स्वीकारा, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.