नागपूर : खरात यांच्याकडे अनेक राजकीय लोक जात होते. एकनाथ शिंदे हे खरातचे भक्त असल्यामुळे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी प्रकरण उघडकीस येऊ दिले, असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी फडणवीसांवर लावला. जर फ़डणवीसांचे दोन-तीन निकटवर्तीय खरातचे भक्त असते तर हे प्रकरण पुढे आले असते का, असा सवालही मानव यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले श्याम मानव?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने शुक्रवारी झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनात श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. ‘बुवा तेथे बाया – खरातसारख्या बाबाला स्त्रीया का फसतात?’ या विषयावर त्यांनी संबोधित केले.

खरात प्रकरणात नाशिक पोलिसांनी स्तुत्य कार्य केले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनी सूट दिल्यामुळेच पोलीस हे करू शकले. गृहमंत्री म्हणून योग्य भूमिका निभावल्यामुळे त्यांचे अभिनंदन मानायला हवे, असे मानव म्हणाले. मात्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खरातचे भक्त असते तर कदाचित हे घडले नसते, असेही ते म्हणाले.

नागपूरमध्ये २०२३ साली झालेल्या बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाचा दाखला त्यांनी दिला. नागपूरमध्ये दिव्य दरबार कार्यक्रमात बागेश्वर बाबा यांनी चमत्काराचा दावा केला. याबाबत पोलिसांना सर्व पुराव्यानिशी माहिती दिल्यावरही गुन्हा दाखल झाला नाही. तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तर अंधश्रद्धा विरोधी कायदा सारखा कुठला कायदा अस्तित्वातच नाही, असे थेट सांगितले.

कायदा तयार करण्यात सक्रिय सहभाग असणाऱ्याला कायदाच अस्तित्वात नाही असे सांगणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याना काय अभ्यास केला असेल, असे श्याम मानव म्हणाले. त्यांचे बॉस जर बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात हजेरी लावत असतील तर पोलिसही कारवाई करणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करत फडणवीसांच्या काळात पोलीस घाबरट झाले असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला.

खरातच्या जाळ्यात फसणाऱ्या स्त्रीया यासाठी दोषी नसून समाजाने लहानपणापासून दिलेले संस्कार, शोषणाची मानसिकता हे कारणीभूत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रा.शरद पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते.

कायदा कमकुवत केल्यामुळेच बुवागिरी फोफावली

२०१३ मध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा तयार झाला, यानंतर २०१४ साली फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांच्या काळात हा कायदा कमकुवत करण्यात आला. याचा प्रसार होऊ दिला गेला नाही, आर्थिक तरतुदीसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या मारल्या, मात्र कधीही मदत मिळाली नाही.

अंनिसच्या कामामुळे आज विदर्भात चमत्कार दाखविणारा एकही बाबा नाही. सरकारच्या मदतीने प्रबोधनाचे हे काम महाराष्ट्रभर सुरू राहिले असते तर आज खरातसारखे बाबा फोफावले नसते. त्यामुळे खरातसारखे बाबा पुढे येण्यासाठी फडणवीसच दोषी आहेत, असा आरोप मानव यांनी लावला.