नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये अनेकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी नाकारल्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला होता. अशातच आता काँग्रेसचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे थेट अयोध्येतील राम मंदिरात पोहोचले. त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर समाजमाध्यमावर पोस्टही केली. या पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे?
श्यामकुमार बर्वे अयोध्येला का गेले?
बर्वे यांनी समाजमाध्यमावर दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गोरखपूर दौऱ्यादरम्यान त्यांनी अयोध्येला भेट दिली. अयोध्येतील राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीची छायाचित्रेही त्यांनी पोस्ट केली आहेत.
राम मंदिराच्या दर्शनानंतर बर्वे काय म्हणाले?
अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेताना आपल्याला रामटेकची आठवण झाल्याचे बर्वे यांच्या पोस्टमधून दिसते. अयोध्येत अशी अनुभूती आली की, जणू आपल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक आणि पारंपरिक श्रीराम गडमंदिराचे दर्शन घेत असल्याचे त्यांनी म्हटले. अयोध्या आणि रामटेक ही दोन्ही पवित्र स्थळे प्रभू श्रीरामाची भक्ती, आस्था आणि सनातन संस्कृतीशी खोलवर जोडलेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अयोध्येत आणखी कोणाची भेट घेतली?
राम मंदिराच्या दर्शनाबरोबरच बर्वे यांनी अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांची भेट घेतली. त्यांच्याशी आत्मीय भेट आणि अर्थपूर्ण संवाद झाल्याचे बर्वे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, या संवादात नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा तपशील पोस्टमध्ये देण्यात आलेला नाही.
काँग्रेस आणि राम मंदिराचा वाद नेमका काय होता?
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काँग्रेसने हे निमंत्रण स्वीकारले नव्हते. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन निवडणुकीच्या फायद्यासाठी पुढे आणल्याचा आरोप करत काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप दिल्याची भूमिका मांडली होती. त्याचवेळी प्रभू राम हे देशातील कोट्यवधी नागरिकांचे श्रद्धास्थान असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले होते.
भाजपने त्यावेळी काय भूमिका घेतली होती?
काँग्रेसने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्यानंतर भाजपने या निर्णयावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसच्या भूमिकेवरून भाजपच्या नेत्यांनी सातत्याने राजकीय हल्ले चढवले. त्यानंतर विविध निवडणुकांमध्येही राम मंदिराचा मुद्दा राजकीय चर्चेत राहिला.

मग बर्वे यांच्या भेटीला महत्त्व का?
बर्वे यांची राम मंदिर भेट ही वैयक्तिक श्रद्धेच्या स्वरूपातील असल्याचे त्यांच्या पोस्टमधील मजकुरावरून दिसते. त्यांनी या भेटीत भाजप किंवा काँग्रेसच्या भूमिकेबाबत कोणतीही राजकीय टिप्पणी केलेली नाही. मात्र, राम मंदिरावरून काँग्रेस-भाजपमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदाराने अयोध्येत जाऊन दर्शन घेतल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. विशेषतः त्यांनी अयोध्या आणि रामटेकमधील धार्मिक-सांस्कृतिक नाते अधोरेखित केल्याने त्यांच्या पोस्टची चर्चा होऊ शकते.
