वर्धा: अत्याधुनिक उपचार यंत्रणा ही रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरते. परंतु अशी सेवा केवळ मोठ्या शहरात व महागड्या शुल्कतच उपलब्ध होत आहे. त्यामुळे कर्करुग्णांना दिलासा मिळणे अवघड ठरते. हे हेरून सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठाने एक पाऊल टाकले आहे. येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न सिद्धार्थ गुप्ता मेमोरीयल कॅन्सर हॉस्पिटलने एक विशेष सेवा या हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापनदिनी रुजू केली.
या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आता ऑनको रीहॅब ही अत्याधुनिक रुग्ण पुनर्वसन भौतिकोपचार सेवा कार्यान्वित झाली आहे. ही सेवा म्हणजे कॅन्सरग्रस्त रुग्णांचे पुनर्वसन आणि सर्वांगीण प्रगतीसाठी राहील. या केंद्रात कॅन्सर उपचारानंतर रुग्णांच्या शारीरिक व मानसिक उपचारावर भर दिल्या जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. इर्शाद कुरेशी यांनी सांगितले.
मेंदू, मणके, मुख, जबडा, जीभ, अन्ननलिका, फुफ्फस, स्तन, पोट व अन्य अवयवाच्या कर्करोग शस्रक्रिया होतात. त्यानंतर पण उपचार होतात. अशा उपचारात ऑनको उपयुक्त ठरणार. सागर मेघे यांनी ही सेवा कार्यरत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कॅन्सर रुग्णालय हे मध्य भारतातील सर्व सोयीयुक्त उपचार केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सेवा कार्यान्वित करतांना विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, प्रशासकीय महासंचालक डॉ. राजीव बोरले, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन भोला यांनी नमूद केले की गत तीन वर्षात या हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. पेट सिटी स्कॅन, सुसज्ज शल्यक्रियागृहे, प्रतिरोपण विभाग तसेच अन्य सुविधा आहेत. तज्ञ चमू असल्याने मध्य भारतातील रुग्ण मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.
येथील १४० खाटांची सोय असलेल्या वैद्यकीय, शल्यक्रिया व रेडीएशन विभागात २० हजाराहून अधिक रुग्णांवार उपचार झाले. वैद्यकीय व परावैद्यकीय शिक्षणाचा विस्तार झाला असून आगामी काळात अद्यावत सुविधा प्रस्तावित असल्याचे डॉ. भोला म्हणाले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर तसेच अभिनंदन दासतेंवार, डॉ. वृषाली आठवले प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. मेघे विद्यापीठ परिसरातच ही सेवा उपलब्ध राहणार.