scorecardresearch

नागपूर: कारागृह पोलिसांचा ‘साइड बिझनेस’; १० ग्रॅम गांजासाठी ५ हजार तर १०० रुपये प्रतिमिनिट कॉलसाठी…

‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून मागणीनुसार गांजा, ड्रग्स, मोबाईल, कोल्ड्रिंक्स, खर्रा, सिगारेट अशा वस्तू पुरवण्यात येत होत्या.

नागपूर: कारागृह पोलिसांचा ‘साइड बिझनेस’; १० ग्रॅम गांजासाठी ५ हजार तर १०० रुपये प्रतिमिनिट कॉलसाठी…
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नागपूर: मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा पुरवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनीच रॅकेट सुरू केले. ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून मागणीनुसार गांजा, ड्रग्स, मोबाईल, कोल्ड्रिंक्स, खर्रा, सिगारेट अशा वस्तू पुरवण्यात येत होत्या. गुन्हे शाखेने या रॅकेटचा छडा लावला असून दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या रॅकेटमधील अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्या कारागृह कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

गेल्या महिन्यांत पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात छापा घालून ‘सर्च ऑपरेशन’ राबवले होते. मात्र, त्यावेळी या छाप्याची कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यामुळे काहीही आढळून आले नाही. कारागृहात कैद्यांना गांजा, दारू, मोबाईल, सीमकार्ड आणि अन्य वस्तू पुरवणारी टोळी तयार झाली होती. त्या टोळीने प्रत्येक वस्तूसाठी वेगळे दर ठरवले होते. १० ग्रॅम गांजासाठी ५ हजार रुपये तर १०० रुपये प्रतिमिनिट कॉल तसेच सिगारेट आणि खाण्यापिण्याच्या अन्य वस्तूसाठी ५ ते १० हजार रुपये कारागृहातील पोलिसांची टोळी घेत होती. कारागृहात बंदिस्त असलेले श्रीकांत थोरात, गोपाल पराते आणि राहुल मेंढेकर या तिघांनी कारागृहातून गांजा आणि काही अन्य वस्तूंची चिठ्ठी एका जेल पोलीस कर्मचारी प्रशांत राठोडकडे दिली होती. ती चिठ्ठी ‘व्हॉट्सॲप’वर कारागृहाबाहेर असलेल्या अजिंक्य राठोड नावाच्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आली. ती चिठ्ठी थेट बाहेर असलेल्या पानठेल्यावर जात होती. अशाप्रकारे गांजाची व्यवस्था करण्यात येत होती.

हेही वाचा >>> नागपूर: कारागृहात ‘राडा’, कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी

राठोड हा अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गांजा थेट कैद्यापर्यंत पोहचइत होता. मंगळवारी ही माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वातील पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मोबाईल, सीमकार्ड आणि अन्य वस्तू जप्त केल्या.

कुख्यात गुंड निषेध वासनिक आणि वैभव तांडेकर हे दोघेही एका हत्याकांडाच्या गुन्ह्यात कारागृहात बंद आहेत. ‘साक्षीदाराला मॅनेज करा…ऐकत नसेल तर त्याचा बंदोबस्त करा…त्याला पैसे द्या…’, असे संदेश एका चिठ्ठीत पाठवून साक्षीदात्यामुळे याप्रकरणी निषेध आणि वैभव यांच्याविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 09:24 IST

संबंधित बातम्या