वर्धा : प्रख्यात गायक मुकेश यांचे, चांदी की दिवार ना तोडो… हे दर्दभरे गीत सार्वकालिक लोकप्रिय. पण आता त्याची प्रचितीच जणू सोनेचांदीच्या बाजारात येवू लागली आहे. कारण केंद्र सरकारने चांदीच्या वाढत्या आयातीवर कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारात होणारी चांदीची विक्रमी आयात रोखण्यासाठी आणि देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल टाकल्याचे म्हटल्या जात आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) चांदीच्या आयात धोरणात मोठे बदल केले आहेत.
आता परवानगी आवश्यक
या नवीन नियमांनुसार, चांदीच्या अनेक प्रमुख श्रेणींना ‘मुक्त’ (Free) लिस्टमधून काढून ‘निर्बंधित’ (Restricted) कॅटेगरीमध्ये टाकण्यात आले आहे. यामुळे आता थेट चांदी आयात करणे व्यापाऱ्यांना शक्य होणार नसून, त्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार, ९९.९ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त शुद्धतेची चांदी (Silver Bars), चांदीची पावडर आणि ग्रेन्स यांच्या आयातीवर हे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता कोणत्याही आयातदाराला या प्रकारच्या चांदीची आयात करायची असल्यास परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून (DGFT) विशेष परवाना किंवा मंजुरी मिळवणे आवश्यक असेल. या निर्णयामुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारचा हा निर्णय का
गेल्या काही महिन्यांत भारतात चांदीची आयात अत्यंत वेगाने वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशाने तब्बल १२ अब्ज डॉलर्स (सुमारे १ लाख कोटी रुपये) किमतीची चांदी आयात केली, जी मागील आर्थिक वर्षातील ४.८ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत जवळपास १५० टक्क्यांनी अधिक आहे. या अफाट आयातीमुळे आणि पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर (Forex Reserve) प्रचंड ताण निर्माण झाला होता. रुपया घसरण्यापासून रोखणे, व्यापार तूट कमी करणे आणि मौल्यवान धातूंचा प्रवाह नियंत्रित करणे या मुख्य उद्देशाने मोदी सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे. यापूर्वी सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून वाढवून थेट १५ टक्के केले होते, त्यानंतरची ही पुढील कठोर पायरी मानली जात आहे.
औद्योगिक मागणी व होणारा परिणाम
भारतात चांदीचा वापर केवळ दागिने बनवण्यासाठीच होत नाही, तर सौर ऊर्जा (Solar Panels), इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमध्येही मोठ्या प्रमाणात होतो. भारत प्रामुख्याने यूएई, ब्रिटन आणि चीन सारख्या देशांमधून चांदी आयात करतो.
तज्ज्ञांच्या मते, नव्या निर्बंधांमुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात चांदीचा पुरवठा मर्यादित होण्याची शक्यता आहे.
सुवर्णपेढीत चिंता सूरू
अनेक शाखा असलेल्या येथील MTD jwelers या सुवर्णपेढीचे एक संचालक सौरव ढोमणे हे म्हणतात कीही बंदी आधीच सूरू झाली होती. पण आता कठोर निर्बंध सूरू झाले. आता १५ टक्के ड्युटी लागली. त्यामुळे चोरट्या मार्गाने भारतात चांदी येणार. या अश्या मार्गाने येणाऱ्या चांदीवर १५ टक्के कस्टम ड्युटी वाचणार. केंद्राने बंदी केली आणि मागणी वाढलेली. विपरीत परिणाम बाजारात दिसणार. चांगले व्यापारी ही दोन नंबरची चांदी घेणार नाही. मग करणार काय, हे ग्राहकांना सांगणे अशक्य. हा निर्णय कदाचित फिरविल्या जाईल. कारण चांदीचा काळाबाजार वाढण्याची संभावना अधिक. रुपयाचे अवमूल्यन थांबविण्याचा केंद्राचा हा एक उपाय राहू शकतो. चांदीच्या भावात वाढ होणार. चोरट्या चांदीमुळे पर्याय कमीज्यास्त भावाचे राहल्यास ते अयोग्य. आमचे व ग्राहकांचे नुकसान.
