बुलढाणा : जेमतेम दीड वर्षापूर्वी राज्य राखीव पोलीस दलात निवड झाल्यावर ‘त्याच्या’ सह परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नाही. जन्माचे सार्थक झाल्याची भावना कुटुंबात निर्माण झाली. त्याचे गावातील मित्र मंडळी, गावकरी देखील आनंदित झाले होते. मात्र जेमतेम दीड वर्षात हे आनंदादायी चित्र बदलले आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला, गावावर शोक कळा पसरली. त्याचा परिवार आणि संपूर्ण गाव दुःखाच्या सागरात बुडाले…

गुंज गावाची शोकांतिका

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात असलेल्या गुंज गावच्या २४ वर्षीय एसआरपीएफ जवानाने कर्तव्यावर असतानाच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या कॅम्पमध्ये घडली. या घटनेमुळे एसआरपीएफ कॅम्पसह जवानाच्या मूळ गाव गुंज (तालुका सिंदखेड राजा) येथे एकच खळबळ उडाली आहे.

मृत्यूशी झुंज

अजय माधवराव वाकोडे (वय २४, रा. गुंज, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) असे गंभीर जखमी जवानाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय सोमवारी रात्री जालना एसआरपीएफ कॅम्पमध्ये कर्तव्यावर होता. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्याने कॅम्पमध्येच ‘एसएलआर’ बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडली. गोळी मानेत लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

संभाजी नगरला हलविले

गोळीचा आवाज ऐकताच कॅम्पमधील सहकारी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अजयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथे तो मृत्यूशी झुंज देत असल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कॅम्पमध्ये धाव घेत एसएलआर बंदूक ताब्यात घेतली. घटनास्थळाची परिस्थिती, शस्त्राचा वापर आणि अजयच्या सहकाऱ्यांचे जबाब घेण्यात आल्याचे समजते.

कारण…काय ?

अजय वाकोडे हा सुमारे दीड वर्षापूर्वीच एसआरपीएफमध्ये भरती झाला होता. तरुण वयात वयात नोकरी मिळाली असताना त्याने आत्मघातासारखे टोकाचे पाऊल का उचलले? त्याच्यावर कोणता ताण होता? घटनेपूर्वी नेमके काय घडले? असे एक ना अनेक अनेक प्रश्न आता ऐरणीवर आले आहे नेमके कारण अद्याप उघड झाले नाही.