भंडारा : बहीण-भावाचे नाते हे केवळ रक्ताचे नसते तर ते प्रेम, जिव्हाळा आणि समर्पणाने गुंफलेले असते.मोठी बहीण लहान भावासाठी आईचे दुसरे रूप असते. तिच्या मायेची उब, काळजी आणि आशीर्वाद हे भावासाठी ईश्वराची छाया ठरतात. भावावर जीव ओवाळून टाकणाऱ्या एका बहिणीने त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच प्राण सोडल्याची अशीच एक हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यात घडली. भावाच्या निधनाची बातमी कानी पडताच बहिणीनेसुद्धा प्राण सोडले.

मोतीराम कुसन राऊत (८०, पालांदूर) यांचे गुरुवार, २६ जूनला दुपारी निधन झाले. ही बातमी वळद (ता. साकोली) येथे राहणारी त्यांची थोरली बहीण भागरथा ऊर्फ मकूबाई नथुजी नेवारे (८५) यांच्या कानी पडताच, त्यांचेही निधन झाले.

मोतीराम कुसन राऊत गुरुजी यांच्या वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी नातलगांना कळविण्यात आली. सोबतच त्यांच्या निधनाची बातमी बहिणीच्या घरी कळविण्यात आली. मात्र मामाच्या निधनाची बातमी आईला कळल्यास ती दुःखी होईल म्हणून तिला मुद्दाम न सांगता कुटुंबीय पालांदूर येथे अंत्यविधीकरिता पोहोचले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इकडे रात्री जेवणाच्या वेळी परिवार एकत्र नसल्याने भागरता ऊर्फ मकूबाईने विचारणा केली असता, नातीने तुमचा मास्तर (गुरुजी) भाऊ मृत पावल्याचे सांगितले. ही बातमी ऐकताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर दोन तासांतच त्यांचाही मृत्यू झाला. मकूबाई व मोतीराम राऊत या बहीण-भावाच्या निधनाची बातमी पालांदूर व वडद येते चर्चेची ठरली.दोघांचेही अंत्यविधी त्यांच्या गावी पार पडले. या दुहेरी दुःखामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.