नागपूर : रामदास पेठेतील मेडिट्रिना रुग्णालयाचा घोटाळेबाज सह संचालक डॉ.समीर पालतेवार विरोधात सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी आणखी एक गंभीर गुन्हा दाखल केला. महिला सहकाऱ्याला जातीवाचक शिविगाळ केल्या प्रकरणात पोलिसांनी डॉ. पालतेवार विरोधात ही कारवाई केली.

मेडिट्रिना रुग्णालयातील महिला कर्मचारी पुनम अंकूश डुकरे यांनी सिताबर्डी पोलिसांना दिलेल्या बयाणात याची माहिती दिल्याने डॉ. पालतेवार विरोधात अॅट्रॉसिटी कलमांतर्गत जातीवाचक शिविगाळ केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला.

रुग्णालयाचे संस्थापक गणेश चक्करवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोट्यवधीचा घोटाळा समोर आला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी यापूर्वीच डॉ. पालतेवारसह अंकेक्षण अधिकारी  अर्पण पांडे, किशोर पांडे, अभिषेक पांडे , वैशाली बडवाईक,  तृप्ती घोडे,  रिता बडवाईक, कल्याणी बडवाईक, नईम दिवाण, सर्वेश ढोमणे, प्रियंका ढोमणे यांना पोलिसांनी आधीच सह आरोपी केले आहे. हा प्रकार समोर येत असताना पुनम या रुग्णालयातील डॉ. महेश सारडा यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होत्या.  त्यावेळी डॉ. पालतेवारने पुनम यांना जातीवाचक शिविगाळ केली होती. त्यामुळे डॉ. पालतेवारच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे.

असा केला गैरव्यवहार

नवीन इस्पितळाचे बांधकाम करण्यासाठी नियमांनुसार डॉक्टरकडे ६७ टक्के शेअर आवश्यक असल्याने रुग्णालयाचे भागीदार असलेले व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट गणेश चक्करवार यांनी १७ टक्के शेअर्स तात्पुरते बुक व्हॅल्युवर ट्रान्सफर करत  सोनाली पालतेवारला अतिरिक्त संचालक बनविले. मात्र त्यानंतर डॉ.पालतेवारने मनमर्जीने सुरु केली. पालतेवार दांपत्याने मुलगा निनादसोबत ऑब्व्हिएट हेल्थकेअर प्रा.लि. ही कंपनी स्थापन केली. त्यांनी २०२०-२१ मध्ये मेडिट्रिनाच्या खात्यातून दोन, २०२१-२२ मध्ये २.९१ , २०२२-२३ मध्ये ३.३६ व २०२३-२४ मध्ये ३.१३ असे एकूण ११.४१ कोटी रुपये काढले. याची कुठलीही कल्पना आपल्याला दिली गेली नाही , असे चक्करवार यांचे म्हणणे आहे. खोटी बिले तयार करून करोडो रूपये कंपनीच्या बँक खात्यातुन काढले. चक्करवार यांनी वार्षिक अहवालाची पाहणी केली असता डिजिटल मार्केटिंग व जाहिरातींच्या नावाखाली बनावट बिले तयार केल्याची बाब समोर आली.