अकोला : वाढत्या उन्हामुळे त्वचा कर्करोगाचा धोका निर्माण झाला आहे. मे महिना हा त्वचा कर्करोग जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे, कारणे, प्रतिबंध आणि उपचार याबाबत व्यापक जनजागृती केली जाते. वाढत्या उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा संपर्क जास्त होत असल्याने या काळात त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक ठरते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

त्वचा कर्करोग म्हणजे काय?

त्वचा कर्करोग हा त्वचेतील पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊन तयार होणारा कर्करोग आहे. प्रामुख्याने तो सूर्याच्या अतिनील किरणांमुळे (Ultraviolet radiation) होतो. त्वचा कर्करोग होण्यामागे अनेक कारणे आहेत. सूर्याच्या युव्ही किरणांचा दीर्घकाळ संपर्क, वारंवार सनबर्न होणे, गोरी त्वचा किंवा संवेदनशील त्वचा, कुटुंबात त्वचा कर्करोगाचा इतिहास, रासायनिक पदार्थांचा संपर्क, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे आदी प्रमुख कारणे आहेत.

त्वचा कर्करोगाची लक्षणे व उपाय काय?

त्वचा कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला किरकोळ वाटू शकतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्वचेवर नवीन गाठ, डाग किंवा असामान्य बदल, तिळाचा आकार, रंग, जाडी किंवा कडा बदलणे, न भरून येणारी जखम किंवा वारंवार रक्त येणे, त्वचेवर खाज, जळजळ किंवा वेदना, एखादा डाग मोठा होणे किंवा रंग बदलणे आदी प्रमुख लक्षणे आहेत. त्वचा कर्करोग टाळण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय करता येतात. सनस्क्रीन वापरणे, संरक्षणात्मक कपडे, उन्हात जाणे टाळणे, त्वचेतील बदल लक्षात ठेवणे आणि संशयास्पद लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे हे उपाय आहेत.

लवकर निदानाचे महत्त्व

त्वचा कर्करोग लवकरच्या टप्प्यात ओळखल्यास त्यावर उपचार करून पूर्ण बरे होण्याची शक्यता जास्त असते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि वाढत्या तापमानामुळे त्वचा कर्करोगाचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचा कर्करोग हा गंभीर आजार असला तरी योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर निदान केल्यास तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो. प्रत्येक नागरिकाने सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे, त्वचेतील बदलांकडे लक्ष देणे आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. त्वचा कर्करोगापासून स्वतःचे संरक्षण करावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.