सिमेंट रस्त्याच्या संथगतीवर संतप्त नागरिकांचा सवाल; रामदासपेठेत वाहतूक कोंडी

ताप सिमेंट रस्त्यांचा

माता कचेरी चौक ते आरपीटीएस या दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी दीड वर्ष लागणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सुरेंद्रनगरातील सिमेट रस्त्याचे बांधकाम करताना विद्युत खांब हलविण्यात आले नाही. रस्त्यावरची वाळू हवेमुळे उडत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

लॉ-कॉलेज चौक ते लेडीज क्लब चौक या दरम्यान दोन्ही मार्गावरील सिमेंट रस्त्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थाना शेजारी नालीचे खोदकाम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे रस्त्याच्या सौंदर्यीकरणाचे काम थांबले. जुन्या भागात डांबरी रस्त्याला नवा सिमेंट रस्ता नीट जोडण्यात आला नाही. तेथून वाहने नेताना अडचणी येतात.

माता कचेरी चौक ते आरपीटीएस चौक दीड किलोमीटरच्या कामाला विलंब होतो आहे. या मार्गावरील एका बाजूचे काम अपूर्णच आहे. बाजूला सुरेंद्रनगर परिसरात रस्त्यावरील वीज खांब न हलविताच सिमेंटीकरण करण्यात आले. रस्त्याचे बांधकाम करताना पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांना खड्डय़ातून प्रवास करावा लागतो. वसंतनगर परिसरात मलवाहिनीच्या खड्डय़ाने एकेरी रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी बंद आहे. अलंकार चौक ते भोले पेट्रोल पंप या परिसरात नागरी वस्त्या आहेत. बिशप कॉटन स्कूल, विविध खासगी शिकवणी वर्ग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आहे. रस्ते बंदीचा फटका व्यावसायिकांना बसला. त्यांनी नोकर कपात केल्याने तरुणांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. बांधकामासाठी रस्त्याच्या दुतर्फा पडून असलेल्या वाळू, गिट्टी, मातीमुळे या मार्गावरून जाणाऱ्यांना त्रास होतो. दरम्यान, अलंकार चौक ते भोले पेट्रोलपंप चौक  रस्त्याचे काम डिसेंबर महिन्यात अधिवेशनामुळे एक ते दीड महिने काम विलंबाने करण्याच्या सूचना होत्या. त्यानंतर होळीच्या दरम्यान कामगार रजेवर गेले. त्यामुळे विलंब झाला. नवीन मार्गात काही रस्त्यांचा वापर होऊन अपघात वा वाहतूक कोंडी होत असल्यास तो बंद केल्या जाईल, असे ठक्कर कंपनीच्या व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले.

विद्यापीठ ग्रंथालय मार्गावर कोंडी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालय ते कल्पना बिल्डिंग मार्गावर रस्त्याच्या एका भागाचे कामही संथगतीने सुरू आहे. या मार्गावर अनेक निवासी संकुल, निवासस्थाने, बँकांसह इतरही खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यांना बाहेरच पडता येत नाही. वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेहमीच वाहतूक कोंडी होते.

परवानग्यांना विलंब झाल्याने फटका

लॉ कॉलेज ते लेडीज क्लब चौक, विद्यापीठ वाचनालय ते कल्पना बिल्डिंग चौक, माता कचेरी ते आरपीटीएस चौक दरम्यानचे रस्ते बांधणीसाठी दिलेली मुदत संपली. परंतु वाहतूक विभागाची परवानगी, भूमिगत जलवाहिन्या, वीज तारा अशा अडचणी आहेत. विविध विभागांची परवानगी मिळण्यास विलंब झाला. नाल्याच्या पुलावरील कामाबाबत स्पष्ट सूचना मिळायला दोन ते अडीच महिने लागले याचाही कामाच्या गतीला फटका बसला. नागरिकांकडूनही सहकार्य मिळाले. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्नामुळे काम बंद होण्याची शक्यता असल्याने कंपनीकडून तातडीने वेळेच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

– सरोज पांडे,  प्रकल्प व्यवस्थापक, जीपीई- एसआरके इन्फ्रा (जे.व्ही)

दोषींवर कारवाई व्हावी

बोले पेट्रोलपंप ते अलंकार टॉकीज चौक व लॉ कॉलेज चौक ते अलंकार टॉकीज या दरम्यानच्या रस्त्याचे काम वेळेवर होत नसल्याने येथे वाहतुकीची कोंडी व अपघात वाढले आहे. रस्त्यावरच टाकलेली वाळू, मातीचे कण हवेमुळे लोकांच्या डोळ्यात जात आहे. काम वेळेवर होत नसल्याने दोषींवर कारवाईची गरज आहे.

राज सेलोटे, नागरिक

 

मार्ग                                                                             कंत्राटदार                                                रस्ताची लांबी

युनिव्‍‌र्हसीटी लायब्ररी चौक ते कल्पना बिल्डींग       जीपीई-एसआरके इन्फ्रा (जे. व्ही.)                  ६०० मीटर

माता कचेरी चौक ते आरटीपीएसजीपीई-                 एसआरके इन्फ्रा (जे. व्ही.)                             १.५० किमी

अलंकार चौक ते भोले पेट्रोलपंप चौक                            ठक्कर कनस्ट्रक्शन                                 २.५० किमी