नागपूर : ज्या प्रकल्पामुळे नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळख मिळणार होती तो प्रकल्पच रखडल्याने व त्यासाठी केंद्राकडून येणारा निधी बंद झाल्याची चर्चा सुरू असल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने गाजावाजा करून घोषित केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात देशभरातील शंभर शहरात नागपूरची निवड झाली. ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे संपूर्ण शहर ‘स्मार्ट’ करणे नव्हे तर एका विशिष्ट भागात सर्व सुविधांयुक्त नागरी प्रकल्पाची उभारणी करणे होय. त्यानुसार पूर्व नागपुरातील एकूण १७३० एकर जागेवर हा प्रकल्प उभारणीचे नियोजन महापालिकेने केले होते. यातील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. कुठली कामे प्राधान्याने करावी याबाबतचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात त्यानुसार काही वर्षांपासून कामे होत नाहीत. अजूनही या भागातील रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्याचा त्रास या भागातील रहिवाशांना होतो आहे. आतापर्यंत केवळ १३ किमी रस्ते पूर्ण झाले आहेत. ‘होम स्वीट होम’ या गृहप्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. प्रकल्पासाठी ज्यांची घरे घेतली जाणार आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत. लोकांना त्यांच्या बहुमजली इमारतीऐवजी भूखंड हवे आहे. तशी मागणी त्यांनी केली. ज्यांची जमीन गेली त्यापैकी केवळ अठरा लोकांना मोबदला मिळाला. काहींना पहिला किंवा दुसरा हप्ता दिला, तिसरा हप्ता मिळाला नाही.

विशेष म्हणजे, नागपूरचे नाव ‘स्मार्ट सिटी’च्या दुसऱ्या यादीत घोषित करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्प अंमलबजावणीत नागपूरने अव्वल स्थान पटकावले. मात्र गेल्या दोन वर्षांच्या करोना काळात या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले.

प्रकल्प काय?

‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात वीज, पाणी, रस्ते, रुग्णालय, शैक्षणिक संस्था अशा उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध असतील. प्रदूषणमुक्त वातावरण, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, उद्यान व हिरवळ, कौशल्य विकास, ग्रंथालय, सुविधायुक्त दहनघाटाचाही त्यात समावेश आहे.

आतापर्यंत ४१८ कोटींचा खर्च

‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात वेगवेगळय़ा एजन्सींकडून विविध कामे केली जात आहेत. जलकुंभ, रस्ते, गृहप्रकल्प आदी कामांवर आतापर्यंत ४१८ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती ‘स्मार्ट सिटी’ प्रशासनाकडून देण्यात आली.

स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत रस्ते आणि घराच्या कामांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५० टक्के निधी आला असून केंद्र सरकारकडून लवकरच उर्वरित निधी मिळेल. काही प्रस्ताव सरकारकडे पाठवले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागेल.

– चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी प्रकल्प, नागपूर.