वर्धा : आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नव्या निवासस्थानी जहाल विषारी सापाचे झालेले आगमन सर्वांची त्रेधातिरपीट उडवून गेले. शहरात उत्सवाचे वातावरण सुरू असताना वर्धा विधानसभेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या मसाळा येथील निवासस्थानाच्या अंगणात चार विषारी सापांपैकी एक असलेल्या घोणस सापाने वास्तव्य ठोकले. त्यास ‘रसेल वायपर’असे म्हणतात.

आमदार घराबाहेर आले, अन्…

आमदार डॉ. पंकज भोयर व परिवारातील सर्व घरात आराम करत असताना पाळीव श्वान जोरजोराने भुंकत होता. तो का भुंकतो, हे पाहण्यासाठी आमदार बाहेर आले असता श्वान जहाल विषारी घोणस सापाला पाहून भुकंत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आवारात काम करत असलेल्या माणसाला लगेच आवाज देवून श्वानाला बांधायला सांगितले व त्वरित विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांना फोन करून तातडीने येण्याविषयी म्हटले.

हे ही वाचा…नागपूर : तब्बल २५ दिवसांनी काढला ‘तिचा’ पुरलेला मृतदेह; प्रियकराने १६ ऑगस्टला…

सापाचा रौद्रावतार पाहून…

सुरकार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता इलेक्ट्रिक डीपीच्या आतमध्ये साप बसलेला दिसला. त्याला काढण्यासाठी प्रयत्न केला असता तो रागाने जोरजोराने आवाज काढून शरीर फुगवून भीती दाखवू लागला. सापाचा हा रौद्रावतार पाहून आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह जमा झालेल्या लोकांच्या अंगावर काटा उभा झाला. सर्वच घाबरले. गजेंद्र सुरकार यांनी स्वता:ला सुरक्षित ठेवत खूप प्रयत्न करून अखेर दीड तासांच्या प्रयत्नानंतर जहाल विषारी घोणस सापाला बरणीत बंद केले आणि लगेच निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षितरित्या सर्वांसमक्ष सोडून दिले.

हे ही वाचा…सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याचा चंद्रपुरात जाहीर निषेध, आंदोलन

घोणसने दंश केल्याचे कसे ओळखावे?

घोषण साप कुकरच्या शिटीसारखा आवाज काढून आपले अस्तित्व अधोरेखित करतो किंवा त्याला डिवचल्यास असे करतो. हा साप कोणत्या क्षणी उंच उडी घेऊन क्षणात किती वेळा दंश करेल, याचा सर्पमित्र आणि सर्पतज्ज्ञांनाही अंदाज येत नाही. हा साप चावल्यास त्याजागी काही वेळातच वेदना सुरू होतात आणि त्या अंगभर पसरतात. काही वेळाने दंशाच्या जागी सूज येते. ती अंगभर पसरते. त्यावर मोठाले फोड येतात. त्यामुळे सापाच्या अंगावर जसे चट्टे दिसतात तसे अंगावर आले असे वाटते. त्यानंतर तोंडातून थुंकीद्वारे व लघवीतून अनेकदा रक्त येते. उपचार घेण्यास उशीर झाल्यास दोन्ही किडण्या निकामी होऊन मृत्यू होतो. सर्पदंशानंतर तिव्र वेदना व ती जागा सुजल्यास घोणस हा विषारी साप चावला, असे समजावे. जेवढ्या लवकर सरकारी दवाखान्यात जाता येईल तेवढ्या लवकर जावे. उशीर झाल्यास वेदनादायक मृत्यूला सामोरे जावे लागते, असे गजेंद्र सुरकार यांनी सांगितले. या जातीचा साप विख्यात सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण डॉ. प्रकाश आमटे यांना चावल्यानंतर अनेक दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले होते. असा हा जहाल साप आहे.