नागपूर : कौटुंबिक कलहामुळे संसार दुभंगण्याच्या स्थितीत असलेल्या शेकडो दाम्पत्यांना समुपदेशन करून त्यांचा संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतात. पती-पत्नीतील वाद संपवून संवाद साधत त्यांचा नव्याने संसार थाटून देत असतात. मात्र, भरोसा सेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याच्याही एक पाऊल पुढे जात तक्रारदार महिलांना हळदी-कुंकवाला बोलावले, त्यांच्या संसाराची ख्याली-खुशाली विचारली व नाते निगुतीने जपण्यासाठीचे भावनिक बळही पुरवले.
कौटुंबिक वादाची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्यांच्यात समेट घडवून यावा यासाठी भरोसा सेल प्रयत्न करते. भरोसा सेलने गेल्या वर्षभरात २२३५ तक्रारींचा निपटारा केला. परंतु, तक्रारदार महिलांची कौटुंबिक समस्या सोडवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी असलेला संपर्क तोडला नाही. त्यांच्या संसाराचा आढावा घेण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू ठेवले.
हेही वाचा >>> नागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास
भरोसा सेलच्या प्रमुख सीमा सुर्वे यांनी सोमवारी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुखी संसार सुरू असलेल्या जवळपास ६० ते ७० महिलांना बोलावण्यात आले होते. त्या महिलांच्या संसाराबाबत आस्थेने व आपुलकीने विचारपूस करण्यात आली. त्यांच्यासोबत हळदी-कुंकू लावून प्रेमाची भेटवस्तू देण्यात आली. अनेक तक्रारदार महिलांनी महिला पोलिसांची गळाभेट घेतली तर पोलिसांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा >>> नागपूर : राज्य कामगार विमा रुग्णालयात ‘राडा’
महिला समुपदेशकांचाही सत्कार
भरोसा सेलमध्ये आलेल्या तक्रारदार महिलांच्या समुपदेशनाची जबाबदारी असलेल्या महिला समुपदेशक समिधा इंगळे, प्रेमलता पाटील, जयमाला डोंगरे, छाया जोशी, नीतू गजभिये, माधुरी इंगोले यांचाही यावेळी शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस अधिकारी सीमा सुर्वे, शुभांगी तकीत, लक्ष्मी गोखले, वैशाली गिरे, रोशनी बोरकर, सुनीता ढमाले यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
तक्रारदार महिलांसाठी माहेरघर म्हणून भरोसा सेल ओळखले जाते. हळदी-कुंकू हे निमित्त होते. या महिलांच्या सुखी संसाराचा आढावा घ्यायचा होता. यातून त्यांच्याशी ऋणानुबंध जोपासण्याचा हा सकारात्मक प्रयत्न आहे.