अकोला : क्रांतिदिनापासून सुरू झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात यंदा अवकाशात प्रकाशोत्सवाची पर्वणी खगोलप्रेमींना लाभणार आहे. दक्षिण भागाला अगस्त्य दर्शन, ययाती व हंस तारका समूहातून उल्का वर्षाव, आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन स्थानकाचा थरार, नुसत्या डोळ्यांनी पाच ग्रह दिसत असल्याची माहिती विश्वभारती केंद्राद्वारे देण्यात आली.

सूर्यग्रहण! मात्र, भारतात दिसणार नाही, कारण काय?

ऑगस्ट महिन्यात दरवर्षी स्वातंत्र्य दिन महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात देशप्रेमी नागरिकांमध्ये उत्साहाची लाट असते. यंदा स्वातंत्र्य दिन सोहळ्यात अवकाश आकर्षक घडामोडी होणार आहेत. १२ ऑगस्ट रोजी वर्षातील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ९.०४ वाजता होईल, ते उत्तररात्री १.२७ वाजेपर्यंत असेल. हे ग्रहण उत्तर रशिया, ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेनमध्ये खग्रास स्वरूपात दिसेल. त्या ठिकाणी दिवसाच अंधार पडणार आहे. भारतातून मात्र हे ग्रहण दिसणार नाही. कारण त्या वेळी भारतात रात्र असेल. भारतातून हे ग्रहण दिसत नसल्यामुळे येथे कोणताही धार्मिक सूतक काळ मानला जाणार नाही किंवा पाळला जाणार नाही. तसेच येत्या श्रावण पौर्णिमेला होणारे खंडग्रास चंद्रग्रहण सुद्धा पाहता येणार नाही, अशी माहिती विश्वभारती केंद्राने दिली.

सलग दोन दिवस उल्का वर्षाव

उल्का वर्षावाची अद्भूत खगोलीय घटना देखील अनुभवता येणार आहे. पृथ्वीच्या वातावरणात एकाच वेळी अनेक उल्का वेगाने प्रवेश करीत असतात. त्यातून आकाशात प्रकाशमान रेषा उमटतांना दिसतात. पृथ्वी जेव्हा एखाद्या धूमकेतूच्या किंवा लघुग्रहाच्या धूलिकणांच्या मार्गावरून प्रवास करते, त्यावेळी कण पृथ्वीच्या वातावरणात जळून खाक होतात. त्यातून उल्का वर्षाव निर्माण होतो. स्वातंत्र्यदिनापूर्वी १२ आणि १३ ऑगस्टला मध्यरात्री ते पहाटेपर्यंत ययाती आणि दोन दिवसानंतर १७ ऑगस्टला रात्री हंस तारका समूहातील उल्का वर्षाव पाहता येईल.

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन स्थानक दिसणार

१२ ऑगस्टला पहाटे ५.१५ ते ५.२१ या वेळेत दक्षिण ते उत्तर पूर्वेस, तर १४ ऑगस्टला याच वेळात नैॠत्य ते ईशान्येस आणि स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे ४.२८ ते ४.३२ ला नैॠत्य ते ईशान्य आकाशात आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन स्थानक दिसणार आहे. तसेच रात्रीच्या प्रारंभी पश्चिमेला तेजस्वी शुक्र, रात्री १० च्या सुमारास पूर्व आकाशात शनी ग्रह, नंतर मंगळ, पहाटे बुध आणि गुरु ग्रह पाहता येणार आहे, असे विश्वभारती केंद्राचे प्रभाकर दोड यांनी सांगितले.