Vijay Wadettiwar Ajit Pawar accident suspicion: ‘काहीतरी शिजतंय’, अशा शब्दात सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी केलेल्या घाईवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला. ‘दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊ नये यासाठी कट कुठेतरी शिजला आणि त्याची ठिणगी आता पडली’, असेही वडेट्टीवार म्हणाले. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आज (०२ फेब्रुवारी) नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी, अजित पवार यांचा अपघात आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केले.

काहीतरी शिजतंय!

‘उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक अथवा सांविधानिक नाही त्यामुळे तेराव्यानंतर देखील शपथविधी करता आला असता’, असे मत नोंदवत ‘काहीतरी शिजतंय’, असा शब्दात त्यांनी शपथविधीच्या घाईवर संशय व्यक्त केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशी अजित पवार यांची इच्छा होती, असे शपथेवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार) सांगतात पण आता राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत काय होईल हे आता विधात्यालाच ठाऊक असे म्हणत अधिक चर्चा करणं सोडून द्यावं, असे वडेट्टीवार म्हणाले.

कुठेतरी कट शिजला, त्याची ठिणगी आता पडली

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांकडून फडणवीस यांना कल्पना देण्यात आली नव्हती यावर बोलताना विलीनीकरणाचा निर्णय अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षातील नेते घेतील. भाजपाला सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? हा पक्ष भाजपाच्या मतानुसार चालतो का? असे प्रश्न उपस्थित होत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या हे खरं असल्याचे सांगताना विलीनीकरण होऊ नये याबाबत कुठेतरी कट शिजला आणि त्याची ठिणगी आता पडल्याचे दिसते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

दाल में कुछ काला है!

अजित पवार यांच्या विमान अपघातावर ८० टक्के लोक संशय व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर हा घातपात असल्याचे बोललं जात आहे. ज्या पायलटचं नाव समोर आलं तो आता जिवंत असल्याचं सांगितलं जातं. ऐनवेळी पायलट का बदलला? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘दाल मे कुछ काला है! त्यामुळे या अपघाताची नि:पक्ष चौकशी व्हायला हवी’, असे मत वडेट्टीवार यांनी मांडले.

प्रफुल पटेल, सुनील तटकरेंना टोला

अजित पवारांना युती सरकारबरोबर घेऊन जाण्यासाठी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे पुढे होते. त्यांना शांत झोप लागावी यासाठी युतीसोबत राहणे त्यांना आवश्यक आहे, असा टोलाही यावेळी वडेट्टीवार यांनी लगावला. पटेल यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पीयूष गोयल यांनी वक्तव्य केले यामागे अंदाज घेण्याचा उद्देश असावा. पण, नकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्यानंतर घुमजाव केले, असेही वडेट्टीवार म्हणाले.