scorecardresearch

नागपूर : पैसे न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने चिरला वृद्ध आईचा गळा

विमलाबाई काटकर (६०, वनदेवीनगर) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे, तर गोविंद काटकर (३२) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

son murder mother nagpur
पैसे न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने चिरला वृद्ध आईचा गळा (प्रातिनिधिक छायाचित्र)

पैसे देण्यास नकार देणाऱ्या वृद्ध आईचा मुलाने विळ्याने गळा चिरून खून केला. ही थरारक घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास वनदेवीनगरात घडली.

विमलाबाई काटकर (६०, वनदेवीनगर) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे, तर गोविंद काटकर (३२) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद काटकर हा बेरोजगार होता. त्याच्या वडिलांचे गेल्या वर्षभरापूर्वी निधन झाले. तेव्हापासून तो आई विमलाबाई यांच्यासोबत राहत होता. वडिलांच्या निधनामुळे तो नैराश्यात गेला होता. त्यामुळे तो मद्याच्या आहारी गेला होता. तो वारंवार आईला पैसे मागत होता. त्यामुळे, आईसुद्धा त्याच्या त्रासाला कंटाळली होती. त्याने रविवारी दुपारी आईला पैसे मागितले होते. परंतु, आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे, त्याने आईशी वाद घातला. मायलेकातील वाद विकोपाला गेला. त्याने घरातून विळा आणला आणि आईच्या गळ्यावर हल्ला करून आईचा खून केला.

हेही वाचा – अपघातप्रवण स्थळे दुरुस्तीसाठी राज्याला ११२ कोटी रुपये; सुरक्षित प्रवासासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाचा प्रयत्न

हेही वाचा – ‘एमपीएससी’ भरतीमध्ये जाचक अटींचा विद्यार्थ्यांना फटका! विभागनिहाय गुणवत्ता यादीमुळे मुख्य परीक्षेला मुकण्याची शक्यता

आईचा खून केल्यानंतर तो गोंधळला. तो घटनेच्या वेळी दारूच्या नशेतही नव्हता असे सांगण्यात आले आहे. आरोपी गोविंद काटकर याने आईचा खून केल्यानंतर बराच वेळ तो घरात बसून होता. त्यानंतर तो यशोधरानगर पोलीस ठाण्यात आला व घडलेली घटना सांगितली. घटना उघडकीस येताच यशोधरा पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. आईने पैसे न दिल्याने मुलाने खून केला हे कारण समोर आले असून, अजून काही कारणांचाही पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळावर पोलिसांकडून पंचनामा, तसेच काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 09:11 IST

संबंधित बातम्या